मुंबई - कोरोना विषाणूने राज्यभर विळखा घातला असून या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राने टाळेबंदी लागू केली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पोलीस मारहाण करीत असल्याच्या चित्रफिती समाज माध्यमांवर फिरत आहेत. तर दुसरीकडे हेच पोलीस बेघर लोकांना अन्न वाटप करून आपल्यातील देवपणाचे दर्शन घडवत आहेत. मुंबई पोलिसांच्या गोवंडी पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस कर्मचारी राजेंद्र घोरपडे यांनी आज चेंबूर येथे आपल्या घरी वयोवृद्ध आईच्या हस्ते 200 कुटुंबांना अन्नधान्य देऊन 25 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला दिला.
![Mumbai cop take initiative to help poor peoples](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-vik-govandipolicecmmdt-vis-mh10014_09042020180753_0904f_1586435873_722.jpg)
राज्यभर कोविड-19 च्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. राज्य सरकार अनेक उपाययोजना करीत आहे. ताळेबंदीने आर्थिक संकट राज्यावर घोंगावत असून समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करावेत, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आव्हान केले होते. अनेक जण मदत करीत आहेत.
![Mumbai cop take initiative to help poor peoples](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-vik-govandipolicecmmdt-vis-mh10014_09042020180753_0904f_1586435873_918.jpg)
उपनगरातील गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी राजेंद्र घोरपडे यांनी एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. ते राहत असलेल्या चेंबूरच्या आनंदनगरमधील गरीब गरजूंना तसेच देवनार मनपा वसाहतीतील व मानखुर्दच्या बांधकाम मजुरांच्या कुटुंबाना धान्य व भाजीपाला वाटप केला असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला पंचवीस हजार रुपयांची मदत केली आहे. त्यांच्या या कृतीमुळे जणू खाकीतील देवाच्या देवपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे.