मुंबई - देशाच्या संसदेत बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने आजतागायत देशासाठी केलेल्या कार्याला खोटे ठरवून आणि देशामध्ये कोरोना वाढीसाठी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, असे म्हणून काँग्रेसबाबत अपप्रचार करून ज्याप्रकारे काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, काँग्रेस विरोधात जी काही गरळ ओकलेली आहे, त्याचा मी जाहीर निषेध करत आहे. पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसून धाधांत खोटे बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील व जगातील पाहिले पंतप्रधान आहेत, अशा परखड शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
निवडणुका आहेत, म्हणून इतक्या खालच्या पातळीचे राजकारण!
भाई जगताप म्हणाले की, देशामध्ये कोरोनाच्या फैलावासाठी मुंबई व महाराष्ट्रातून आपापल्या गावी गेलेल्या मजुरांमुळे कोरोनाचा पंजाब, उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशात जास्त फैलाव झाला आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणुका आहेत, म्हणून इतक्या खालच्या पातळीचे राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. श्रमिक आणि मजुरांना कोरोना काळात भाजप सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले होते. कोरोनाच्या भीतीने वेगवेगळ्या मार्गाने हे श्रमिक मजूर आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांच्यासाठी ज्या ट्रेन सोडण्यात आल्या, त्यावरही केंद्र सरकारने भरमसाठ शुल्क आकारले. त्यावेळेस काँग्रेसने त्याचा कडाडून विरोध केला होता. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार त्यावेळेस काँग्रेसने या परप्रांतीय मजुरांना आपापल्या गावी जाता यावे म्हणून त्यांच्यासाठी मोफत अनेक रेल्वेगाड्या सोडल्या व त्यांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करून दिली होती. धारावी सारख्या विभागात जिथे कोरोनाचे रुग्ण सर्वात जास्त होते. त्या विभागात काँग्रेसच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी विशेष लक्ष घालून काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीने धारावी विभाग कोरोनामुक्त करून दाखवला. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) घेतली, त्याची प्रशंसा केली आणि मग त्यांच्या कामाला धारावी पॅटर्न म्हणून जगभर नावलौकिक मिळाला.
काँग्रेस नसती तर...
भाई जगताप पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना माझे एक सांगणे आहे की, देशामध्ये जर काँग्रेस नसती तर, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. काँग्रेस नसती तर देशामध्ये संविधानाच्या आधारावर लोकशाहीचा पाया भरला गेला नसता. काँग्रेस नसती तर, १९४७ साली स्वतंत्र झालेला भारत, एक तिरंगा, एक संसद, एक संविधान झाले नसते. ज्यावेळेस परदेशातून अन्नधान्य विकत मागवून खाण्याची वेळ देशावर आली होती, तो देश कृषिप्रधान देश म्हणून परिपूर्ण झाला नसता. काँग्रेस नसती तर, देशभरामध्ये २०१४ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा सन्मान भारताला मिळाला नसता. काँग्रेस नसती तर, कदाचित या देशामध्ये इस्रोची स्थापना झाली नसती, देशामध्ये गरिबांना कुठल्याही बँकेमध्ये आपले खाते उघडता आले नसते. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यावेळेस बँकांचे राष्ट्रीयकरण केले म्हणून देशातील प्रत्येक तळागाळातील नागरिकाला तो अधिकार मिळाला. बांगलादेशची निर्मिती झाली नसती. काँग्रेस नसती तर आज जी शिक्षणव्यवस्था आपण पाहत आहोत, आयआयएम, आयआयटी, आयटीआय अशा संस्थांचा उदय झाला नसता.
आपले खोटे लपविण्यासाठी पाप नरेंद्र मोदी काँग्रेसच्या माथी मारत आहेत
भाई जगताप पुढे म्हणाले की, १२ फेब्रुवारी २०२० रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी कोरोना नावाचे गंभीर संकट देशावर घोंघावत आहे. ते थोपवण्यासाठी ताबडतोब त्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असा धोक्याचा इशारा दिला होता. त्यावेळेस केंद्रातील भाजप सरकारने आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांची चेष्टा केली होती. तसेच केंद्रातील भाजप सरकारने त्याकडे लक्ष न देता २४ व २५ फेब्रुवारी २०२० रोजी गुजरातच्या मोटेरा स्टेडियमवर नमस्ते ट्रम्प असा मोठा इव्हेंट केला. ज्यामध्ये ६ लाख नागरिक जमा झाले होते. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत त्यांच्या देशातील १५ हजार लोक उपस्थित होते. ज्यातील कितीतरी लोक नंतर कोविड पॉझिटिव्ह निघाले. त्यावेळेस झालेला कोरोना प्रादुर्भाव मोदी सरकारला दिसत नाही का? आज आपले खोटे लपविण्यासाठी आपले पाप नरेंद्र मोदी काँग्रेसच्या माथी मारत आहेत, जे संपूर्णतः निषेधार्ह आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असेही भाई जगताप म्हणाले.
हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना नियंत्रणात, आज 6 हजार 107 नव्या बाधितांची नोंद