मुंबई - कोरोनाच्या भीतीने देशात लॉकडाऊन केले आहे. मुंबईतील सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामेदेखील बंद करण्यात आली आहेत. असे असताना मेट्रो 3 प्रकल्पाअंतर्गत काही ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातच जी मुंबई महानगरपालिका कोरोनाशी दोन हात करत आहे, त्याच पालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सुरूच आहे. ही बाब माहिती अधिकार कार्यकर्ते झोरू बाथेना यांनी ही बाब समोर आणत याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे. 'जरी हे काम अत्यावश्यक असेल, तरीही यामुळे कामगारांना कोरोनाची लागण होण्याची भीती नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.
हेही वाचा... पत्रकारावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी चिदंबरम यांनी योगी सरकारला खडसावले
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आणि घरी राहणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा, बांधकाम बंद करण्यात आली आहेत. असे असताना कोस्टल रोड प्रकल्पाचे काम मात्र सुरू आहे. नियम धाब्यावर बसवत ब्रीच कँडी साईटवर काम सुरु असल्याचा आरोप बाथेना यांनी केला आहे. बुधवारी रात्रीदेखील काम सुरू होतं. याची तक्रार केल्यानंतर काम बंद करण्यात आले आहे. मात्र, आज (गुरुवार) सकाळपासून पुन्हा कामास सुरुवात झाली. आज चक्क समुद्रात भरावाचे काम केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यासंबंधीच्या पुराव्यासह त्यांनी ट्विटरवर पोलीस तक्रार दाखल केली आहे. तसेच हे काम त्वरीत बंद करण्याची मागणी केली आहे.