मुंबई - देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. त्यातही राज्यातील कोरोनाचा पहिला बळी मुंबईत गेल्याने प्रशासनाने आता अधिक उपाययोजना करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन आता कोरोनाच्या रडारवर असल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकल ट्रेन बंद करण्याच्या सुरु असलेल्या विचाराबाबत मुंबईकरांनी आपल्या प्रतिक्रिया ईटीव्ही भारतकडे व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा... कोरोना इफेक्ट : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज चालणार फक्त 2 तास
मुंबईत कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण दगावल्यानंतर यासंदर्भात राज्य शासनाकडून उपाययोजनेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईची ओळख देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा सुरु असते. तसेच मुंबईची लाईफलाईन मानली जाणाऱ्या रेल्वेमधून दररोज जवळपास 70 लाख लोक प्रवास करत असतात. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे लोकल रेल्वेवर काही प्रमाणात बंदी आणावी का ? असा विचार सध्या राज्य शासनाकडून विचाराधीन आहे. लोकल रेल्वे जर काही दिवसांसाठी बंद केली तर याचा परिणाम काय होऊ शकतो हे मुंबईतल्या प्रवाशांनी सांगितले आहे.
लोकल रेल्वे बंद केल्यास त्याचा परिणाम दररोज कामावर जाणाऱ्या लाखो लोकांवर होईल. त्यांना वाहतुक, प्रवास या समस्यांना मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागेल, असे काही प्रवाशांनी सांगितले. तर काहींनी थोडे दिवस लोकल रेल्वे बंद ठेवल्या कोरोनाला आळा घालता येईल, असे मत व्यक्त केले.