मुंबई - जालना जिल्ह्यातील युवतीवर मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये अत्याचाराची घटना घडली. अत्याचारानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी चुनाभट्टी पोलीस स्थानकाच्या कार्यालयात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, अतिरिक्त पोलीस आयुक्त लख्मी गौतम व पोलीस उपायुक्त शशि मीना यांच्या उपस्थितीत पीडितेचा भाऊ आणि त्यांच्या नातेवाईकांशी तपशीलवार चर्चा करण्यात आली.
चर्चेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी लक्षात घेऊन या घटनेचा तपास ‘सीबी-सीआयडी’कडे त्वरीत सोपविण्यात येणार आहे. ‘सीबी-सीआयडी’कडून त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात येणार आहे. या बरोबरच या प्रकरणातील मृत पीडितेच्या भावाला पोलीस संरक्षण दिले जाणार आहे.
हेही वाचा - ठाण्यात चुनाभट्टी बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसचा मेणबत्ती मोर्चा
घटना घडल्यानंतर पीडितेला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेच्या कुटुंबीयांना योग्य वागणूक दिली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला होता. ही गोष्ट लक्षात घेऊन संबंधित डॉक्टरांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही महिला आयोगाने दिले आहेत.