मुंबई - कोरोनाच्या संकटातही अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा देत आहे. मात्र, गर्दीत काम करणाऱ्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे (टीसी) काम सोपे होण्याकरता मध्य रेल्वेनेने शक्कल लढविली आहे. मध्य रेल्वेेच्या मुंबई विभागाने (टीसी) नेकबँड पोर्टेबल पब्लिक अड्रेस (पीए) प्रणाली दिली आहे. त्यामुळे टीसी गळ्यात पोर्टेबल अनाऊंसमेंट सिस्टम घालून प्रवाशांना सूचना देवू शकणार आहेत.
मध्य रेल्वेने सुरुवातीला पोर्टेबल अनाऊंसमेंट सिस्टमचे 50 संच खरेदी केले आहेत. येत्या काही दिवसांत अन्य तिकिट तपासणी कर्मचाऱ्यांनाही ते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटात आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवाशांशी संवाद साधणे सोपे होणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पालनासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचना कर्मचाऱ्यांना व्यवस्थित ऐकू याव्यात, हा त्यामागील उद्देश आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वाणिज्य शाखेने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना 1 हजार 250 एन 95 मास्क, 1 हजार 250 फेस शिल्ड, 500 पीपीई किट, 7 हजार डोक्याच्या टोप्या, हातमोजे आणि सॅनिटायझर्स उपलब्ध करून दिले आहे.
मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोएल म्हणाले की, सर्व सुरक्षा साधने सज्ज ठेवल्याने आघाडीवरील कर्मचाऱ्यांना भीती न बाळगता कर्तव्य पार पाडण्यास मदत होवू शकणार आहे. संसर्ग होण्याचा धोका असतानासुद्धा तिकिट तपासणी कर्मचारी अनेकदा प्रवाशांना विविध प्रकारची मदत करतात. लहान मुलांना रेल्वे डब्ब्यात घेऊन जातात. ज्येष्ठ नागरिकांना व्हिल चेअरने नेण्यासाठी तर काही वेळा गर्भवती महिलेला आवश्यक ती मदत करत असतात.
पोर्टेबल अनाउन्समेंट सिस्टिमसची ही आहेत वैशिष्ट्ये
• 12 W च्या जास्तीत जास्त आवाजाच्या आउटपुट आणि कॉम्पॅक्ट अल्ट्रा पोर्टेबल पीए अम्पलीफायर आहे.
• हेडबँड मायक्रोफोनला जोडण्यासाठी 3.5 मिमी मायक्रोफोन इनपुट सॉकेट आहे. डीव्हीडी, सीडी किंवा एमपी 3 ला जोडण्यासाठी 3.5 मिमी लाइन इनपुट सॉकेट आहे.
• कर्मचाऱ्यांना हाताळण्यासाठी व वापरण्यासाठी सोयीस्कर आहे.
रेल्वे स्टेशनवर प्रवासी आल्यानंतर त्यांना सूचना देण्यासाठी ही पीए सिस्टिम टीसीसाठी उपयुक्त ठरणार आहे.