मुंबई - मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो, मोनोचे काम तसेच रस्त्यांची दुरुस्ती आणि नुकतेच बंद करण्यात आलेले धोकादायक पुलामुळे बेस्ट बसेसचे मार्ग बदलण्यात आले. यामुळे बेस्टला दिवसाला अंदाजे ६ ते ७ लाखांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
नुकतेच पालिकेने जुहू सर्कल येथील धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद केला. मात्र तेथे हलक्या वाहनांना परवानगी असल्यामुळे बेस्ट बस व्यतिरिक्त रिक्षा, टॅक्सी व खासगी बसेस ये-जा करत आहेत. यामुळे बेस्टला या ठिकाणी असलेला मार्ग बदलावा लागल्याने एका बसमागे ६० हजार रुपयांच्या नफ्याला मुकावे लागत आहे. त्यामुळे एसएनडीटी महाविद्यालयाच्या अंतर्गत रस्त्यावरून बेस्टच्या मिनी बसला परवानगी द्यावी अशी मागणी बेस्ट समिती सदस्यांकडून करण्यात आली.
गेले वर्षभर अंधेरीच्या गोखले पुलावर बेस्ट बस बंद करण्यात आली. यामुळे विलेपार्ले ते एअरपोर्ट मार्गे बेस्ट बसला वळसा घालावा लागत आहे. परिणामी या मार्गावरील बसेसचे प्रवाशांना बेस्टला मुकावे लागत आहे. शासनाच्या कामामुळे बेस्टला मार्ग बदलावे लागत आहे, त्यामुळे बेस्टला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने बेस्टला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील बेस्ट समितीच्या बैठकीत आज करण्यात आली.
नुकतीच वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त मधुकर पांडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. यामध्ये बसेससाठी एक स्वतंत्र लेन राहील, असे बेस्टचे महाव्यवस्थापकांनी सांगितले.