मुंबई - भाजप नेते प्रवीण दरेकर ( BJP Leader Pravin Darekar ) यांना मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) चौकशीसाठी हजर होण्याबाबत नोटीस बजावली आहे. मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी ( Mumbai Bank Case ) दरेकर यांच्या विरोधात रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अटक होऊ नये यासाठी दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court ) धाव घेतली होती. मात्र, सत्र न्यायालयाचे त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातून ( Mumbai High Court ) त्यांना दिलासा मिळाला आहे.
यापूर्वीही झाली चौकशी - यापूर्वी देखील प्रवीण दरेकर यांची पोलिसांकडून 4 एप्रिल रोजी चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी पोलिसांच्या चौकशीला सहकार्य केले होते. सुमारे तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. प्रविण दरेकर यांच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता दिलासा - आम आदमी पक्षाच्या वतीने धनंजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मजूर नसतानाही प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँक संचालक पदाची निवडणूक लढवली. त्या माध्यमातून दरेकर यांनी मुंबई बँकेचे ठेवीदार प्रशासन आणि सरकार यांची 20 वर्षे फसवणूक केली असा आरोप दरेकर यांच्यावर आहे. प्रवीण दरेकर यांना सोमवारी (दि.04) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून 1997 पासून मुंबई बँकेवर निवडून येत आहेत. दरेकर हे नागरी सरकार बँक आणि मजू अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. त्याची मुंबई बँकेवर संचालक म्हणूनही बिनविरोध निवड झाली होती. प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर यांना अपात्र ठरवले आहे. प्रवीण दरेकर यांनी आपल्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली. प्रविण दरेकर यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांचा दिलासा दिला होता. दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता. या जामीन अर्जावर 29 मार्च रोजी हायकोर्टात वेळेअभावी सुनावणी पार पडू शकली नाही. त्यामुळे दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून दिलासा कायम ठेवण्याची मागणी केली होती.
काय आहे प्रकरण..? - 2017 च्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काम केल्याबद्दल दरेकर यांनी 25 हजार 700 रुपयांची मजूरी घेतल्याची नोंद आहे. डिसेंबर, 2017 मध्ये नागपूर अधिवेशन सुरू असताना मजूर म्हणून काम केल्याचा परतावा कसा घेतला ? मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी असताना दरेकर यांनी अनेक घोटाळे केले असल्याचे आरोप करण्यात आले ( Mumbai Bank Case ) होते. प्रवीण दरेकर हे बँकेच्या संचालक मंडळावर निवडून गेले होते. मात्र, त्यांनी मजूर या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. प्रवीण दरेकर यांनी बोगस पद्धतीने मजूर म्हणून नोंदणी केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे. त्यामुळे दरेकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.
हेही वाचा - Somaiya in Court : किरीट सोमय्या यांची मुंबई सत्र न्यायालयात धाव