मुंबई : देशाची दुसरी खासगी ट्रेन असलेली मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस येत्या 14 फेब्रुवारी म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'च्या मूहुर्तावर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशनकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या नवीन जोडप्यांचे आयआरसीटीसीकडून थाटात स्वागत केले जाणार आहे.
आठवड्यातून चार दिवस धावणार तेजस
प्रवाशांची गर्दी बघता तेजस एक्सप्रेस 14 फेब्रुवारीपासून आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे चार दिवस धावणार आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रवाशांना आयआरसीटीसीकडून सुरक्षा किट देण्यात येणार आहे. प्रवाशांनी एक्सप्रेसमधून प्रवास केल्यानंतर एक्सप्रेसचे, सीटचे सॅनिटायझेशन केले जाणार असल्याची माहिती आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक राहुल हिमालियन यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.
असा करणार 'व्हॅलेंटाईन डे' साजरा
'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने तेजस एक्स्प्रेसमध्ये कोचची सजावट, प्रवाशांचे स्वागत हटके पध्दतीने केले जाणार आहे. तसेच ज्या प्रवाशांचा लग्नाचा वाढदिवस आहे. त्या प्रवाशांचा वाढदिवस गाडीत जोरदार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रवासादरम्यान नवीन जोडप्यांचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे. तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासह सण-उत्सव, राष्ट्रीय सण साजरे करण्यावर भर दिला जातो.
तिन्ही खासगी ट्रेन पुन्हा धावणार
कोरोनाच्या पार्श्वभूवीर देशात धावणार्या आयआरसीटीसीच्या तिन्ही खासगी ट्रेनही रद्द करण्यात आलेल्या होत्या. ज्यात मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि काशी-महाकाल एक्स्प्रेसचा समावेश होता. पण अनलॉकची सुरुवात होताच मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवासी मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा खासगी तेजस बंद करण्याची नामुष्की आयआरसीटीसीवर आली होती. मात्र आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने ही एक्सप्रेस 14 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.