मुंबई - रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने मुंबई ते अहमदाबाद चालविण्यात येणारी खासगी तेजस एक्सप्रेस उद्यापासून पुन्हा धावणार आहे. ट्रेन क्रमांक 82902 / 82901अहमदाबाद - मुंबई सेंट्रल तेजस एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे आठवड्यातील चार दिवस चालणार असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली.
यामुळे होती तेजस एक्सप्रेस बंद-
कोरोनाच्या पार्श्वभूवीर देशात धावणार्या आयआरसीटीसीच्या तिन्ही खासगी ट्रेन सुद्धा रद्द करण्यात आलेल्या होत्या. ज्यात मुंबई- अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनऊ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेसचा समावेश आहे. पण अनलॉकची सुरुवात होताच मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. मात्र प्रवासी मिळत नसल्यामुळे पुन्हा एकदा खासगी तेजस बंद करण्यात आली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. मात्र, आता मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आल्याने खबरदारी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचे प्रवासी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी ट्रेन क्रमांक 82902 / 82901 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविड नियमांची अंमलबजावणी-
ट्रेन क्रमांक 82902 / 82901 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस आता ७ ऑगस्ट २०२१ पासून आठवड्यातील चार दिवस चालविण्याचा निर्णय इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशने घेतला आहे. तसेच भविष्यात प्रवाशांच्या मागणीनुसार, या गाडीला नियमित चालविण्याचा निर्णय घेणार आहे. तसेच तेजस एक्स्प्रेसमध्ये शासनाने आखून दिलेल्या कोविड नियम पाळले जाणार आहे. विशेष म्हणजे तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवास करण्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग केली जाणार आहे. याशिवाय तेजस एक्स्प्रेसच्या स्वच्छालय आणि रेल्वे डब्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे असल्याची माहिती आयआरसीटीसीचे संपर्क अधिकारी पिनाकिन मोरावाला यांनी दिली आहे.
अंधेरी येथे विशेष थांबा-
आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-अहमदाबाद धावणाऱ्या तेजस एक्सप्रेस ला अंधेरी येथे एक विशेष थांबा देण्यात आलेला आहे. गाडी क्रमांक 82901 मुंबई सेंट्रल - अहमदाबाद तेजस एक्सप्रेस दुपारी 3.56 वाजता अंधेरी येथे थांबा घेण्यात येईल. तर, दुपारी 3.58 वाजता येथून सुटेल. तर, गाडी क्रमांक 82902 अहमदाबाद - मुंबई सेंट्रल तेजस एक्सप्रेस अंधेरी येथे दुपारी 12.28 वाजता थांबा घेऊन दुपारी 12.30 येथून मुंबई सेंट्रलसाठी सुटेल.