मुंबई - मुंबईत वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार पाचपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळणा-या सोसायट्या आता मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. अशा सोसायट्यांनी पहिल्यांदा कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास 20 हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, अशा सोसायट्यांनी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करावी असे आवाहन महापालिका आयुक्तांकडून करण्यात आले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने सोमवारपासून कडक निर्बंध जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नियमाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. यात कोविड नियम मोडणा-या सोसायटींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास अशी इमारत सील केली जाते. अशा सोसायट्या आता मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. सोसायट्यांनी गेटबाहेर तसा फलक लावणे आवश्य़क आहे. या सोसायट्यांनी कोविड नियम पाऴणे बंधनकारक असून, बाहेरील व्यक्तीस सोसायटीत प्रवेश देऊ नये. संबंधित गृहनिर्माण सोसायटीने या सर्वाचे निरीक्षण करून नियमाच्या अंमलबजावणीसाठी जबादारी घ्यावी असे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र सोसायटीने नियमाची अंमलबजावणी न केल्यास सोसायटीकडून १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. संबंधित सोसायटीने पुन्हा दुर्लक्ष करून नियम मोडल्यास २० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पालिकेने तसे आदेश दिले असून त्याबाबत परिपत्रकही जारी केले आहे.
काय आहे नियम?
ज्या इमारतीत ५ रुग्ण आढळून आले आहेत, त्या इमारती मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केल्या जातील. अशा इमारतीबाहेर पोलीस तैनात करण्यात येतील. बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेश बंदी असेल. वर्तमान पत्र विक्रेत्यांनी सोसायटीच्या गेटवर वर्तमानपत्र द्यावे. जीवनावश्यक वस्तू, आदी साहित्यही सोसायटीच्या गेटवर स्वीकारावेत. सोसायटीतील व्यक्तीला कोरोना चाचणी करायची असल्यास त्यांनी लॅबच्या व्यक्तीला घरी बोलवावे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडल्यास त्याच्यावर एफआयआर दाखल केला जाईल असे माहापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - नाशकात मिनी लॉकडाऊनला सुरूवात; बाजारपेठेत शुकशुकाट