मुंबई - राज्यातील रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राज्यातील अपघातांची संख्या कमी होत नाही. गेल्या सात महिन्यात राज्यात १६ हजार ५६९ रस्ते अपघात झाले असून यामध्ये ७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनाचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर १२ हजारांपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक अपघात हे मुंबई शहरात झाले आहेत. तर राज्यातील सर्वाधिक अपघाती मृत्यू हे नाशिक शहरात झाले आहेत. त्यामुळे मुंबई आणि नाशिक शहरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबाद ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा...
राज्यात ३ हजार ५२० अपघात वाढले
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत अपघातांच्या संख्येत २० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै २०२० या काळात राज्यात एकूण १३ हजार ४९ अपघात झाले होते. त्यात जानेवारी ते जुलै २०२१ या काळात १६ हजार ५६९पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा ३ हजार ५२० अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच या अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही यावर्षी वाढली आहे. राज्यात गेल्यावर्षी जानेवारी ते जुलै २०२० या काळात एकूण ५ हजार ९७० अपघाती मृत्यू झाले होते. त्यात यंदा ७ हजार ७८५ इतकी वाढ झाली आहे. यंदा अपघातांमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांचा आकडा १२ हजारांपार गेला आहे. गेल्यावर्षी १० हजार ७६३ प्रवासी अपघातांमध्ये जखमी झाले होते. यंदा त्यांची संख्या १२ हजार ६४५ इतकी झाली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून मिळत आहे.
मुंबईत अपघात वाढले
मुंबईत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांची संख्या ९१०वरून १ हजार १३४पर्यंत वाढली आहे. मात्र अपघातांमध्ये मृत्यू पावण्याचे प्रमाण मुंबईत १६७वरून १४९पर्यंत घटले आहे. याशिवाय अपघातांमध्ये जखमी होण्याचे प्रमाणही ९०७ प्रवाशांवरून ९७९पर्यंत वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त नाशिक ८५५, अहमदनगर ७९०, पुणे ७७४, कोल्हापूर ५८२, सोलापूर ५२१, नागपूर ५१७, जळगाव ४९२ आणि नांदेड ४६१ या जिल्ह्यात सर्वाधिक अपघात झाले आहेत.
सर्वाधिक अपघाती मृत्यू 'या' जिल्ह्यात
राज्यात गेल्यावर्षी एकूण ५ हजार ९७० अपघाती मृत्यू झाले होते. यंदा ७ हजार ७८५ इतकी वाढ झाली आहे. अपघाती मृत्यूमध्ये वाढ झालेल्या जिल्ह्यामध्ये नाशिकचा पहिला क्रमांक लागतो. नाशिकमध्ये ५२८, पुणे ४९२, अहमदनगर ४३०, जळगाव ३२८, सोलापूर २९२, सातारा २७३, नागूपर (ग्रामीण) २७६, औरंगाबाद २३७, बीड २३८ आणि कोल्हापूरमध्ये २१८ अपघाती मृत्यू झाले आहेत.