मुंबई - कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. आता ही परीक्षा शनिवार ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यासंबंधित आयोगाने परिपत्रक जारी केले आहे.
हेही वाचा - 'एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा
आयोगाने काढले परिपत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या परीक्षेसंदर्भातील जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट व संयुक्त पूर्व परीक्षा २०२०च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून ९ एप्रिल, २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त सूचनानुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. यासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या दिनांक ३ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार प्रस्तुत परीक्षा शनिवार ४ सप्टेंबर, २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
हेही वाचा - MPSC Recruitment : १५ हजार ५११ पदांच्या भरतीला शासनाची मान्यता; जुलै अखेरपर्यंत प्रक्रिया होणार पूर्ण
८०६ जागांसाठी होणार परीक्षा
मार्च महिन्यात ८०६ जागांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा शनिवार ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.