मुंबई - गडचिरोलीत झालेला नक्षलवादी हल्ला हा भाजप सरकारच्या मवाळ भूमिकेचाच परिणाम असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्लाचा तीव्र शब्दात निषेध केला.
खासदार चव्हाण पुढे म्हणाले, की महाराष्ट्रात गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकारही राहिलेला नाही. नक्षलवाद्यांनी एवढा मोठा हल्ला करेपर्यंत गृहविभाग काय करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यांनी तत्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.
केंद्रातील मोदी सरकार असो वा राज्यातील फडणवीस सरकार, दोन्हीही फक्त मोठ-मोठ्या गप्पा मारण्यातच पटाईत आहेत. या सरकारच्या काळात देशात दहशतवादी व नक्षलवाद्यांचे हल्ले वाढले. पण भाजपला त्याचे काहीही पडलेले नाही. फक्त प्रचारसभेतच घरात घुसून मारण्याच्या फुशारक्या मारण्यात भाजपवाले पटाईत आहेत. नोटाबंदीने नक्षलवाद व दहशवादाचा बिमोड होणार असल्याचा दावाही यांनीच केला होता. पण त्याचाही काही परिणाम झालेला दिसत नाही. भाजप सरकारची दहशतवादाविरोधात काही ठोस भूमिका नाही. त्यामुळेच या सरकारच्या काळात दहशतवाद्यांचे व नक्षलवाद्यांचे मनोधैर्य वाढले आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.
गडचिरोलीत वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात काँग्रेस पक्ष सहभागी असल्याचेही यावेळी चव्हाण म्हणाले.