मुंबई - मुलीची हत्या करून तिला फासावर चढवल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या अंधेरीतील पारशीवाडा भागात घडली आहे. आईनेच मुलीचा गळा दाबून हत्या करून नंतर तिला फासावर चढवत आत्महत्येचा बनावा रचला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने सांगितलेल्या या माहितीचा उलगडा मुलीच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमधून झाला.
मानसिकरित्या आजारी असलेल्या मुलीची तिच्या आईने गळा दाबून हत्या केली. नंतर स्वत:चा गुन्हा लपवण्यासाठी या क्रूर महिलेने मुलीच्या मृतदेहाला फासावर लटकवले. ज्या प्रकारे मुलीला फासावर लटकवण्यात आले होते, त्यावरून पोलिसांना हे आत्महत्येचे प्रकरण नसल्याचा संशय आला होता. शवविच्छेदनाची रिपोर्ट येताच पोलिसांचा संशय खरा ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना पहिला संशय मृत मुलीच्या आईवर आला होता. तपासानंतर आणि विचारपूस केल्यानंतर अखेर मृत मुलीच्या आईने तिचा गुन्हा कबूल केला. आरोपी महिलेविरूद्ध कलम 302 अंतर्गत मुंबई अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.