मुंबई - मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील 1916 या इमरजन्सी क्रमांकावर कोव्हिड 19 म्हणजेच कोरोना विषयी हेल्पलाईन सुरू केली आहे. या क्रमांकावर महिनाभरात 72 हजार कॉल आले. त्यापैकी सर्वाधिक कॉल हे पालिकेकडून देण्यात येणाऱ्या आहाराच्या, अन्नधान्याच्या तक्रारीबाबत तसेच रुग्णालयातील खाटांसाठी करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
मुंबईत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी पालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सुरू केला आहे. मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात वॉर रूम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा 1916 हा क्रमांक 24 एप्रिलपासून हेल्पलाईन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
पालिकेच्या 1916 या क्रमांकावर गेल्या महिनाभरात सुमारे 72434 कॉल आले. त्यापैकी सर्वाधिक 25539 कॉल हे पालिकेकडून दिला जाणारा आहार, अन्नधान्य, प्रवासाबाबत होते. रुग्णालयात खाटा आहेत का यासाठी 21309 कॉल होते. डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शनासाठी 14253 कॉल तर अँम्ब्युलन्ससाठी 11333 कॉल आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
रुग्णांसाठी खाटांचे नियोजन करता यावे म्हणून आपत्कालीन व्यवस्थापन विभागात खाटांची माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे. पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात तीन पाळ्यामध्ये 48 कर्मचारी असतात मात्र कोरोनाची लागण झाल्याने काही कर्मचारी होम क्वारेंटाईन असल्याने प्रत्येक पाळीत सहा कर्मचारी काम करत असून प्रत्येक पाळीत 3 ते 4 डॉक्टर काम करत असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.