मुंबई : राज्यात शहरी व ग्रामीण भागात परतीची वेळ ही वाहन चालक व प्रवाशांना मृत्यूच्या वाटेवर घेऊन जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्यावर्षी राज्यात झालेल्या अपघातांचा अभ्यास केला असता, सायंकाळी ६ ते रात्री ९ या परतीच्या वेळी सर्वाधिक अपघात आणि अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वर्षभरात सर्वाधिक अपघात हे डिसेंबर व जानेवारी नोंदवण्यात झाली आहे.
डिसेंबर व जानेवारीमध्ये अधिक अपघात
राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील अपघातांचे विश्लेषण केले असता, सर्वाधिक अपघात व मृत्यू हे सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत घडल्याची माहिती आहे. राज्यात २०२० मध्ये परतीच्या या तीन तासांत एकूण ४ हजार ६०७ अपघातांत ५ हजार ६९९ प्रवासी अपघातग्रस्त झाले. या अपघातांमधील २ हजार ०४१ जीवघेण्या अपघातांमध्ये तब्बल २ हजार १९० लोकांना प्राण गमवावे लागले. याउलट १ हजार ६२५ अपघातांमध्ये २ हजार ४४४ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, ६६३ अपघातांमध्ये १ हजार ०६५ लोक किरकोळ जखमी झाले असून २७८ अपघातांमध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. वर्षभरात जानेवारी आणि डिसेंबर या दोन महिन्यांत सर्वाधिक अपघात झाल्याची माहिती आहे. २०२०मध्ये जानेवारी महिन्यात एकूण २ हजार ९१९ अपघातांमध्ये १ हजार १८७ प्रवाशांचा मृत्यू झाला. याशिवाय या अपघातांमध्ये एकूण १ हजार ८८६ लोक गंभीर, तर ४७ लोक किरकोळ जखमी झाले होते. डिसेंबर महिन्यातही तब्बल ३ हजार ०७२ अपघात झाले असून १ हजार ४६२ प्रवाशांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, डिसेंबरमधील अपतांमध्ये १ हजार ७२३ प्रवासी गंभीर, तर ६५९ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
वेळेनुसार झालेले अपघात व मृत्यूंची आकडेवारी
राज्यात सकाळी ६ ते सकाळी ९ वाजेदरम्यान १ हजार २३ अपघात झाले असून यामध्ये ३९९ जणांचा मृत्यू झालेला आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजताचा दरम्यान १ हजार ४३५ अपघात झाले असून यामध्ये ४२४ जणांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. दुपारी १२ ते ३ वाजताचा दरम्यान १ हजार ४३० अपघात झाले असून ज्यामध्ये ४४९ जणांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ चा दरम्यान १ हजार ५२४ अपघात झाले असून यामध्ये ५१९ जणांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत राज्यात १ हजार ६४३ अपघात झाले असून ज्यामध्ये ५२६ जणांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. रात्री ९ ते मध्यरात्री १२ वाजताचादरम्यान राज्यात १ हजार २१५ अपघात झाले असून ४१६ जणांचा अपघाती मृत्यू झालेला आहे.
खराब वातावरणात कमी अपघात
राज्यातील अपघातांचा हवामानाशी काही संबंध आहे का? याचीही पाहणी महामार्ग पोलिसांनी केली आहे. राज्यात खराब वातावरणात अपघातांमध्ये कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. पावसाळी वातावरणात राज्यात एकूण ७०० अपघात झाले असून त्यात ३४६ लोकांचा मृत्यू झाला. धूक पडल्यावर दृष्यमान खराब असताना राज्यात केवळ ३१३ अपघातांची नोंद असून त्यात १५२ लोकांचा मृत्यू झाला. याउलट सूर्य निघालेला असताना आणि साफ वातावरणात तब्बल २३ हजार ९४५ अपघात झाले. अर्थात वातावरण चांगले असताना ११ हजार ०६१ लोकांना अपघातांमध्ये प्राण गमवावा लागला आहे.
हेही वाचा - वळण रस्ता नव्हे तर सरळ मार्गच धोक्याचे! राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक अपघात सरळ मार्गांवर!