मुंबई - राज्यात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. लॉकडाऊनमुळे जूनपर्यंत कोरोनाचे सुमारे ५ हजार रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलथा दिल्यावर कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ झाली होती. जुलैमध्ये बाधितांचा आकडा १० हजार, तर सप्टेंबरमध्ये २४ हजारावर प्रतिदिवशी पोहोचला होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये रुग्णांचा आकडा कमी होऊन पुन्हा ५ हजारावर आला. २६ ऑक्टोबरला ३६४५ इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज पुन्हा ३,९५९ इतके कमी रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या सहा महिन्यातील राज्यात दुसऱ्यांदा कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
१५० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू-
राज्यात आज ६,७४८ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ६९ हजार ०९० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.५३ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ३,९५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर १५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४५,११५ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३,७८,५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,१४,२७३ (१८.२८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,७१,१६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,७९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९९,१५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कधी किती रुग्ण आढळून आले -
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हि रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची तर २६ ऑक्टोबरला ३६४५ सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर आज ७ नोव्हेंबरला ३,९५९ कमी रुग्ण आढळून आले आहेत.
नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी -
आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन आरोग्मयंत्र्यांनी केले आहे.