मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने देशाची आर्थिक राजधानी सुरू असलेल्या अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या 4 महिन्यांच्या कालखंडात या पथकाने तब्बल 35 कोटी 44 लाख 40 हजार 861 रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. आतापर्यंत अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या 4 महिन्यांमध्ये 1200 गुन्हे दाखल करत 1307 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 3203 किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत.
66 लाख 65 हजारांची हेरॉईन जप्त -
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या 4 महिन्यांमध्ये हेरॉईन संदर्भात 3 गुन्हे दाखल केलेले असून या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तब्बल 66 लाख 65 हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
10 कोटी रुपयांची चरस जप्त -
चरस अमली पदार्थ तस्करी संदर्भात अमली पदार्थविरोधी पथकाने 20 गुन्हे दाखल केले असून या संदर्भात 35 अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली आहे. तब्बल 40 किलो चरस जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 10 कोटी 56 लाख 85 हजार एवढी आहे.
20 कोटी रुपयांची कोकेन जप्त -
कोकेन अमली पदार्थांच्या तस्करी यासंदर्भात अमली पदार्थविरोधी पथकाने 2 गुन्हे दाखल करून 2 अमलीपदार्थ तस्करांना अटक केलेली आहे. तब्बल 20 कोटी 10 लाख रुपये किमतीचे कोकेन अमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे.
2998 किलो गांजा जप्त -
गांजा अमली पदार्थाची सर्वाधिक तस्करी मुंबई शहरात होत असून गेल्या 4 महिन्याच्या कालखंडात 116 गुन्हे या संदर्भात नोंदविण्यात आले असून यामध्ये 129 आरोपींना अटक करत तब्बल 2998 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या या गांजाची किंमत पाच कोटी 83 लाख 59 हजार एवढी आहे.
41 किलो एमडी जप्त -
स्वस्त आणि मस्त अमली पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेफेड्रोन म्हणजेच एमडी संदर्भात अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत 41 गुन्हे दाखल करून 53 अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. तब्बल 41 किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत तब्बल 15 कोटी 99 लाख 71 हजार एवढी आहे.
अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरोधातही कारवाई -
इतर प्रकरणांमध्ये 19 गुन्हे अमली पदार्थ तस्करी यासंदर्भात नोंदविण्यात आले असून 27 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 124 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या बरोबरच अमली पदार्थ सेवन करण्याच्या गुन्ह्याखाली 999 गुन्हे दाखल करत 1058 व्यक्तींना अमली पदार्थाचे सेवन करण्याच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे.