नाशिक - सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात अमलीपदार्थ सेवनाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. बॉलिवूडमध्ये अमली पदार्थाचे सर्रास सेवन केले जात असल्याचे आरोप होवू लागले आहेत. त्याच प्रमाणे मोठ्या शहरांमध्ये देखील अमली पदार्थ सेवनाचे प्रमाणही जास्त असल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपट सुष्ट्रीतील अनेक जण ड्रग्स सेवन करतांनाचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. तर काही अभिनेत्यांनी सार्वजनिक रित्या ड्रग्सचं व्यसन असल्याची कबूल देखील दिली आहे. त्याच प्रमाणे युवावर्ग मोठ्या प्रमाणात या अमली पदार्थ सेवनाचा व्यसानाधिन झाला आहे. त्यामुळे युवकांना या ड्रग्सच्या काळ्या अंधारात लोटणाऱ्या या धंद्याला आळा घालण्यासाठी कठोर कायदे होण्याची गरज असल्याचे मत नार्कोटिक्स विभागाचे निवृत्त अधिकारी सुहास गोखले यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केले आहे.
सुरुवातीच्या काळात गांजा स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्याने याचे व्यसन हे गरीब व्यसनी लोक करीत होते. मात्र, आता श्रीमंत व्यसनी लोकांमध्ये याची क्रेझ वाढली आहे. याच गांज्याला आता ग्रास, विड आणि मेरियोनो नावाने प्रतिष्ठा मिळत असून या गांजाचा सर्रास वापर कॉलेज,पब, रेव्ह पार्टी मध्ये होताना दिसून येत आहे. काही युरोपियन देशात गांजा विक्री आणि सेवनाला अधिकृत मान्यता दिली आहे. भारतात देखील काही वर्षांपूर्वी गांजा विक्रीला अधिकृत मान्यता द्यावी, अशी मागणी झाली आहे. मात्र तरुणांचे भविष्य वाचवायचे असेल तर याला विरोध झाला पाहिजे, असे मत सुहास गोखले यांनी व्यक्त केले.
कोकेनची होती आंतरराष्ट्रीय तस्करी-
जगात कोकेन ड्रग्सचे साऊथ अमेरिका, पेरू, कोलंबिया या भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते आणि हे कोकेन नायजीरिया मार्गाने अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान मार्गाने भारतात येते. व्यसनाधिन व्यक्तीला कोकेन ड्रग्सच्या काही ग्रॅम साठी हजारो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे श्रीमंत वर्गात याची मोठी मागणी असते.याच मोठ्या शहरातील महाविद्यालयीन तरुणांकडून अमली पदार्थाचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जात आहे.
ड्रग्स सेवनाचा व्हिडिओ ठोस पुरावा ठरत नाही-
मध्यंतरीच्या काळात बॉलिवूड मधील नामांकित कलाकारांचा ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामधील कलाकारांना बघून त्यांनी ड्रग्स सेवन केले असे दिसते. मात्र फक्त व्हिडिओ वरून कारवाई करणे कठीण होते. तेथील इतर माहिती मिळत नाही. तांत्रिक अडचणी सुद्धा असतात. त्यामुळे अशा केसच्या मुळापर्यंत पोहोचणे शक्य होत नसल्याचेही सुहास गोखले यांनी सांगितले.
नार्कोटिक्स 1985 मधील कायद्यात बदल-
1980 च्या दशकात इतर देशासह भारतात देखील आंतराष्ट्रीय ड्रग्स तस्करांच्या टोळ्या तयार झाल्या होत्या. देशात मुंबईमध्ये सुद्धा ड्रग्स तस्करांनी आपली पाळेमुळे पसरवण्यास सुरुवात केली होती. तेव्हा 1985 मध्ये नारकोटिक्स कायदा अंमलात आला. त्यामध्ये कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. ड्रग्सची विक्री करणारा आणि ड्रग्स सेवन करणाऱ्या व्यक्तीला 10 ते 20 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 1 ते 2 लाखां पर्यंत दंड होता. एखाद्या व्यक्तीकडे 1 किंवा 2 ग्रॅम ड्रग्स मिळून आला तरी त्याला कठोर शिक्षा होत होती. म्हणून अनेकांनी हा कायदा अन्यायकारक असल्याचं म्हटले. त्यानंतर 2000 साली या कायद्यात बदल करण्यात आले आणि कमर्शल आणि नॉन कमर्शल असे भाग पाडण्यात आले. तसेच 2 ते 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली.