मुंबई - मोदी सरकार २.० मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. मोदी सरकार 2.0 मध्ये २०१९ पासून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नव्हता. मोदी सरकारचा पहिला विस्तार सर्वसमावेशक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार अनेक खासदारांना त्यांच्या कामाचे बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातील खासदार पूनम महाजन यांच्या नावाचीही वर्णी लागली आहे.
पुनम भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या असून 2006 मध्ये त्यांची हत्या झाल्यानंतर पूनम यांनी राजकारणात पाऊल ठेवले. काही वर्षे पक्ष संघटनेचे काम केल्यानंतर 2010 मध्ये भाजपने भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पूनम महाजन यांची निवड केली. भारतीय जनता पक्षामधील तरुण तडफदार नेतृत्व म्हणून पुनम महाजन यांच्याकडे पाहिले जाते. सध्या त्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत. तसेच भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे.
पूनम महाजन यांची कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमी -
पूनम महाजन यांचा जन्म 9 डिसेंबर १९८० रोजी मुंबईत एका महाराष्ट्रीयन कुटूंबात झाला. पूनम यांच्या वडिलांचे नाव प्रमोद महाजन आणि आईचे नाव रेखा महाजन आहे. त्यांच्या भावाचे नाव राहुल महाजन असून तो टीव्ही कलाकार आहे. पूनम यांचे उच्च शिक्षण अमेरिका व इंग्लंडमध्ये झाले आहे. पूनम यांनी २०१२ मध्ये ब्राइटन स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंटमधून बीटेकची पदवी घेतली आहे. त्याचबरोबर त्यांनी टेक्सास, यूएस येथील एअर मिस्ट्रल फ्लाईंग स्कूलमधून पायलट लायसेंस मिळवली आहे. त्यासाठी त्यांना 300 तास फ्लाईंग करावी लागली होती. त्यांचा विवाह हैदराबाद येथील उद्योगपती आनंद राव बेजंदिले यांच्याशी झाला असून त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव आदया राव आणि मुलीचे नाव अविका राव असे आहे.
कुटूबांची राजकीय पार्श्वभूमी -
पूनम महाजन यांचे वडील भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन होते. प्रमोद महाजन भाजपचे रणनितीकार होते व मुंबई शहर उत्तर-पूर्व मतदारसंघातील माजी खासदार होते. ३ मे 2006 ला प्रमोद महाजन यांचे छोटे भाऊ प्रवीण महाजन यांनी त्यांची हत्या केली. वडील प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर पूनम महाजन राजकारणात आल्या. पूनम महाजन यांना राजकारणात तिचे मामा गोपीनाथ मुंडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
राजकारणाची सुरूवात आणि प्रवास -
प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर पूनम महाजन २००६ मध्ये राजकारणात आल्या. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पूनम यांनी २००९ मध्ये पहिल्यांदाच घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राम कदम यांच्या विरोधात त्यांनी ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराजय झाला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पूनम यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात प्रिया दत्त यांच्याविरोधात उभे केले. या निवडणुकीत पूनम यांनी प्रिया दत्त यांना 1.8 लाख मतांच्या फरकाने हरवले होते. ८ डिसेंबर २०१४ मध्ये पूनम प्रायव्हेट मेंबर्स बिल्स आणि रिजोल्यूशन कमिटीची सदस्या बनल्या. 2019 मध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांनी आपला गड राखला होता. तब्बल १ लाख २५ हजार ९६४ मतांची आघाडी घेत काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा दुसऱ्यांदा दारुण पराभव केला.
..या क्षेत्रात केले काम -
पूनम एक प्रशिक्षित वैमानिक आहेत. त्यांनी पायलट ट्रेनिंग अमेरिकेतील टेक्सास येथून घेतली आहे. पूनम भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्याचबरोबर भारतीय बास्केट बॉल संघाच्या प्रमुखही आहेत. या पदाला संभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. पूनम यांना महिला सुरक्षा, महिला सशक्तिकरण, पशु सुरक्षा, शहर विकास आणि पायाभूत सुविधा व पर्यावरण सारख्या विषयांमध्ये विशेष रुची आहे. राजकारणातील जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्या घर व एनजीओ सुद्धा चालवतात.
अवघ्या दहा वर्षांत भाजपची कार्यकर्ती म्हणून पक्षनिष्ठा स्वीकारणाऱ्या पूनम महाजन यांनी त्याच पक्षात मुंबईची तरुण खासदार होण्याचा मान मिळवला.
14 वर्षे भरतनाट्यम शिकून त्यांनी करिअरच्या दृष्टीने प्रोफेशनल पायलटचे लायसन्सही मिळविले आहे.
ट्रिपल तलाक कायदा मंजूर करताना त्यांनी मोदी सरकारची संसेदत भक्कमपणे बाजू मांडली. 2016 साली भारतीय युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
एका कार्यक्रमात लैंगिक शोषण झाल्याचे म्हटले -
भाजप खासदार पूनम महाजन यांनी २०१७ मध्ये अहमदाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले, त्या की काही वेळा त्यांनी लैंगिक शोषणाच्या शिकार झाल्या आहेत. अहमदाबादमध्ये आयआयएम विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाचा उल्लेख केला. रेड ब्रिक संमेलनात बोलताना पूनम यांनी म्हटले की, जेव्हा त्या रेल्वेने कॉलेजला जात होत्या तेव्हा त्यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते.