मुंबई - हार्बर मार्गावरील लोकल रेल्वेच्या गार्डचा मोबाईल चोरून नेल्याने शनिवारी माहिम स्थानकात लोकल तब्बल 15 मिनिटे खोळंबली होती. आतापर्यंत लोकल प्रवाशांचे मोबाईल चोरीला जात होते. मात्र, माहिम स्थानकावर आलेल्या लोकलमधील गार्डचा मोबाईल चोरून नेणाऱ्या एका मोबाईल चोराचा पाठलाग सत्येंद्र कुमार महातो या गार्डने केला. मात्र, रेल्वे रुळांजवळ असलेल्या झोपडपट्टीत हा चोर नाहीसा झाला. त्यानंतर लोकल गार्डने या संदर्भात जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
हेही वाचा - सत्यजित देशमुखांनी काँग्रेसचा 'हात' सोडला, झाले भाजपवासी
शनिवारी संध्याकाळी 7.51 मिनिटांनी हार्बर मार्गावरील लोकल माहीमला आली होती. त्यावेळी लोकल रेल्वेच्या गार्डचा हातातील मोबाईल एका चोरट्याने चोरून नेल्यामुळे गार्डने लोकल रेल्वेचा आपत्कालीन ब्रेक लावून या चोरट्याचा पाठलाग सुरू केला.
हेही वाचा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; जन्मदिनीच डॉक्टरसह चालकाचा मृत्यू
स्थानकात उभ्या असलेल्या मोटरमनला गार्डकडून लोकल स्थानकातून पुढे नेण्यासाठी प्रतिसाद न मिळाल्याने ही लोकल तब्बल 15 मिनिटे माहिम स्थानकावर उभी होती. मोबाईल चोराचा अयशस्वी पाठलाग करून परतलेल्या गार्डने जीआरपी पोलिसांना याबद्दल तक्रार दिली. त्यानंतर गार्ड परत लोकलमध्ये आल्यावर स्थानकावरील लोकल रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आली. या प्रकरणी जीआरपी पोलीस मोबाईल चोराचा तपास करत आहेत.
हेही वाचा - राज्यातील आणखी एक काँग्रेस 'निष्ठावंत' घराणे भाजपच्या गळाला