मुंबई - बांगलादेशी व पाकिस्तानी नागरिकांची 'घरवापसी' करण्यासाठी मनसेने येत्या ९ फेब्रुवारीला मोर्चाचे आयोजन केले आहे. पक्षाने या मोर्चासाठी वीर जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मार्गावर पोलीस परवानगी मागितली होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत मनसेला संबंधित परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आता गिरगाव चौपाटी, हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर मनसे मोर्चा काढणार आहे.
मनसेने मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान या मार्गावरून मोर्चा काढण्यासंबंधी पोलिसांनी सुचवले होते. त्यानुसार मार्ग बदलण्यात आल्याचे समजते. कायदा व सुव्यवस्थेवर ताण निर्माण होऊ नये, यासाठी मनसेला अपेक्षित मार्गावर परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे. भायखळा ते आझाद मैदान या मार्गावर मोहम्मद अली रस्त्याचा काही भाग मनसेच्या मोर्चा मार्गात येत होता.
याठिकाणी आधीच सीएएला विरोध सुरू आहे. मनसेने या मार्गावरून मोर्चा नेल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांनी सुचवलेल्या मार्गावर मनसेने रविवारी ९ फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता मोर्चा काढणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.