मुंबई - वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट मातोश्रीबाहेर बॅनर लावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढीव वीज बिलाचं काय झालं, असा प्रश्न विचारला आहे. या बॅनरमधून मनसेने उद्धव ठाकरेंना नववर्षाच्या शुभेच्छा देत, त्यांना वीजबिलाच्या आश्वासनाचीही आठवण करून दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! मुख्यमंत्री महोदय... गोड बोलता बोलता नवीन वर्ष आलं. गोड बातमी तर राहिली दूर, पण जनतेचे हालचं हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही. तरी वीज बिल भरा, असं ऊर्जा मंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं', असा प्रश्न मनसेने या बॅनरमधून विचारला आहे.
उद्धव ठाकरे जनतेला गोड बातमी देतील
गोड गोड बोलता बोलता वर्ष कस गेलं हे कळालच नाही. आज नूतन वर्षानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसेने शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी फक्त गोड गोड न बोलता या नवीन वर्षांत जनतेला देखील दिलासा देणे आवश्यक आहे. वीज बिल आणि शाळेची फी असेल त्या संदर्भात योग्य निर्णय घेतला पाहिजे. ऊर्जा मंत्री म्हणाले होती दिवाळीत गोड बातमी देतो. परंतु वीज बिल कमी काही करण्यात आले नाही. या नवीन वर्षात तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला गोड बातमी देतील, ही अपेक्षा! असे मनसे नेते अखिल चित्रे यांनी सांगितले.