मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्या बाहेर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी मोठे हृदय दाखवून मुंबईकर आणि मुंबई महापालिकेला सहकार्य करावे अशी विनंती या पोस्टरमधून करण्यात आली आहे. प्रतीक्षा बंगल्याजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम थांबले आहे. त्यासाठी मुंबई महानगर पालिकेने बच्चन यांना नोटीस पाठवली आहे. त्याला बच्चन यांनी अद्याप प्रतिसाद दिला नाही. त्यावरून बुधवारी मनसेच्या वतीने बच्चन यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण-
अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेरील रोडवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. त्यानंतर या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या हेतून मुंबई महानगर पालिकेने बच्चन यांना त्यांच्या बंगल्याची सुरक्षा भिंत पाडण्यासंदर्भात 2017 मध्ये नोटीस पाठवली आहे. मात्र, बच्चन यांनी अद्याप त्या नोटीसवर कोणतीही प्रतिक्रिया अथवा उत्तर दिले नाही. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या खोळंबले आहे. त्यानंतर मनसेने बच्चन यांच्या घराचे बाहेर बोर्ड लावून बिग बी यांनी त्यांचे बिग हार्ट दाखवावे आणि रस्त्याच्या रुंदीकरणासाठी घराची सुरक्षा भिंत पाडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
प्रतीक्षा बंगल्याबाहेरून जाणाऱ्या या रस्त्याची रुंदी सध्या 45 फुट आहे. मात्र, या रस्त्यावर सध्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बीएमसी हा रस्ता 60 फूट रुंद करणार आहे. त्यातच बच्चन यांच्या घराबाहेर रोजच वाहतूक कोंडी झालेली असते. त्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम बीएमसीने हाती घेतले आहे. त्यासाठी बच्चन यांच्या बंगल्याची सुरक्षा भिंत पाडावी लागणार आहे. म्हणून बीएमसीने बच्चन यांना नोटीस पाठवली होती. मात्र बच्चन यांनी कोर्टाचा दरवाजा वाजवला. यावर सुनावणी घेत कोर्टाने या रुंदीकरणाच्या कामाला स्थगिती दिली. मात्र, गेल्यावर्षी न्यायालयाने पुन्हा हे काम सुरू कऱण्याची परवानगी दिली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या वतीने बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर पोस्टर बाजी करण्यात आली आहे. त्यावर big b show bih heart अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत. तसेच या पोस्टरच्या माध्यमातून मनसेने म्हटले आहे की, तुम्ही महानायक आहात. बिग बी आहात, तुम्ही तुमचे हृदय मोठे करून मुंबईकर आणि बीएमसीची अडचण दूर करावी. आम्हला तुमच्या सहकार्याची प्रतीक्षा असल्याचे म्हटले आहे. तसेच बिग बी यांच्या द्वारे कोणत्याही प्रकारचे सहकार्य नाही मिळाल्यास मनसे बीएमसीच्या बाहेर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.