मुंबई - विक्रोळी पूर्वेला असलेल्या क्रांतिवीर महात्मा जोतिबा फुले रुग्णालयात सकाळी १०च्या सुमारास रुग्णालयात काम करत असणाऱ्या महिला डॉ. वर्षा माने यांच्या अंगावर स्लॅब कोसळला. यात त्या जखमी झाल्या असून तत्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
या रुग्णालयातील ही चौथी घटना असून त्यात कर्मचाऱ्यांना दुखापतीही झाल्या होत्या. त्यामुळे आज या घटनेमुळे मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुग्णालयाच्या परिसरात गोंधळ घातला. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ बोलविण्याचा आग्रह धरत परिसरात संबंधित अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करत ७ दिवसांची वेळ देण्यात आली आहे. नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करू व विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू, असे यावेळी मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले.