मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे उद्या (शुक्रवारी) दुपारी 12 वाजता मनसेच्या मुंबई विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मनसे विधानसभा निवडणूक लढणार की नाही याचा फैसला होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेत संभ्रम, सूत्रांची माहिती
ईव्हीएम विरोधात आक्रमक असणाऱ्या राज ठाकरेंनी ईडीच्या चौकशीनंतर चुप्पी साधली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते. मात्र, तरीही ठाकरे विधानसभा निवडणुकीबाबत मौन बाळगून आहेत. यामुळे मनसे नेते पदाधिकारी संभ्रमात आहे. त्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला मनसेचे सडेतोड उत्तर
बैठकीला ठाकरे उपस्थित राहणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत विभाग अध्यक्षांची मत जाणून घेतली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यावेळी काहींनी स्वबळावर तर काहींनी आघाडीसोबत जाण्याचा कौल दिला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे हे घटस्थापनेच्या दिवशी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करतील असे बोलले जात आहे.