मुंबई - गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी त्याचा धोका कायम आहे. टाळेबंदीचा निर्णय किंवा निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय हा टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार केला जातो. यासाठी आज (सोमवारी) मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांची भेट घेत टास्क फोर्समध्ये अजून काही व्यापक मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ यांचा देखील समावेश करावा, अशी मागणी देशपांडे यांनी निवेदनातून केली आहे.
'या' मुद्यांचा केलाय उल्लेख
आपल्यासारखी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी तर आहेतच, पण त्याबरोबर काही अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, data analysts , शिक्षणतज्ञ अशा लोकांचा समावेश करणे आवश्यक आहे. याच कारण अस की सध्या फक्त कोरोना रोग, त्याचे उपचार व त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम फक्त यावरच विचार होताना दिसत आहे. या सगळ्याचा रोजच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार केला जात नाही आहे, असे माझे निरीक्षण आहे. आज लाखों लोकांचा रोजगार गेला आहे. अनेकांचे उद्योगधंदे बुडालेले आहेत, लोकांचे बँकांचे हफ्ते थकलेले आहेत, अर्थ चक्र ठप्प झालेलं आहे. यावर उपाय काय? याचीही चर्चा आवश्यक आहे, अशा विविध मुद्यांचा उल्लेख मनसे नेते संदिप देशपांडे यांनी आपल्या निवेदनात केला आहे.