मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होणार का हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी याबाबत उघडपणे वार्ता केली नसली तरी शक्यता देखील नाकारली नाही आहे. मात्र सतत घडणाऱ्या काही घटना या दोन्ही पक्षात काहीतरी सुरू आहे याचा अंदाज देऊन जातो. काही वेळापूर्वीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
वैयक्तिक कारणांसाठी भेट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. दोन नेते एकमेकांना भेटले की राजकीय चर्चा होत असे विधान केले. यामुळे पुन्हा नव्या चर्चेला पेव फुटले आहे. तुम्ही जो अर्थ लावायचा तो लावा. मी वैयक्तिक कारणासाठी या भेटीला आलो होतो असे नांदगावकर यांनी सांगितले.
उत्तर द्यायला वानखेडे सक्षम
एनसीबी प्रमुख समीर वानखेडे हे सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. महा विकास आघाडीचे नेते त्यांच्यावरती टीका करत असताना विरोधी पक्षातील नेते त्यांच्या समर्थनात उतरले आहेत. वानखेडे यांची बाजू घेत नांदगावकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. समीर वानखेडे हे शासकीय अधिकारी आहेत. ते त्यांची ड्युटी चोख बजावत असतील अशी मला खात्री आहे. आणि तरीही जर त्यांच्यावर आरोप होत असतील तर त्यांना उत्तर द्यायला ते सक्षम आहेत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही. मी त्यांना दीर्घकाळापासून ओळखत आहे असे नांदगावकर यांनी सांगितले.
पदाधिकारी यांचा मेळावा
आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका समोर ठेवून मनसे कामाला लागली आहे. 23 ऑक्टोबरला मनसेप्रमुख राज ठाकरे भांडूपला कार्यकर्ता मेळावा घेणार आहे. याबाबत बोलताना नांदगावकर यांनी सांगितले की, सर्व शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा मेळावा आम्ही आयोजित केला आहे. यात मुंबईचे सर्व पदाधिकारी असतील. तिथून पुढे आम्ही पुण्याला जाऊ, त्यानंतर पिंपरी चिंचवडलाही जाणार आहोत असे ते म्हणाले.
हेही वाचा - नाशिक मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची जय्यत तयारी