मुंबई - मुंबईतील आयईएस न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रशासनाने शुल्क न भरल्याने जवळपास ४०० विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. त्यामुळे त्यामुळे पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांच्याकडे धाव घेतली. पालकांच्या तक्रारीची दखल घेत चित्रे यांनी शाळेत ठिय्या आंदोलन केले. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय प्रशासनाचा असल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली. त्यानुसार आता मनसेकडून ४८ तासांची मुदत देत विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात प्रवेश न दिल्यास शुक्रवारी शाळेबाहेर विद्यार्थी व पालकांना घेऊन भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
४०० विद्यार्थ्यांचे शैक्षाणिक नुकसान होणार -
कोरोनाच्या परिस्थितीचा समाजातील प्रत्येक घटकावर वाईट परिणाम झाला आहे. बहुतेक नागरिकांनी यासाथीच्या रोगाशी चालू असलेल्या लढाई दरम्यान आपले प्राण किंवा नोकऱ्या गमावल्या आहेत. मुंबईतही कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून रोजगार नसल्याने किंवा उपचारात प्रचंड पैसा खर्च झाल्याने बहुतेक लोकांच्या घरात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. अशातच १५ जूनपासून सर्वत्र ऑनलाईन शाळा सुरू झाल्या. मात्र त्यापूर्वी अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना चालू शैक्षणिक वर्षाचे पूर्ण शुल्क भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेकांनी शुल्क भरणे शक्य होत नसल्याने पालकांकडून सवलत मागण्यात येत होती. मात्र अनेक शिक्षणसंस्थांनी याकडे दुर्लक्ष करत पालकांना शुल्क भरण्यास भाग पाडले. वांद्रेमधील आयईएस न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रशासनाने शुल्क न भरल्याने जवळपास ४०० विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अकाऊंट ब्लॉक केले. त्यामुळे ४०० विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
शाळेला ४८ तासांची मुदत -
विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांना शुल्क न भरल्याने ऑनलाईन वर्गामध्ये प्रवेश न दिल्याचे सांगण्यात आले. यावर पालकांनी शुल्क भरण्याची तयारी दर्शवली. मात्र ज्याचा वापर विद्यार्थ्यांकडून झाला नाही, अशा घटकांचे शुल्क भरण्यास नकार दिला. मात्र शाळांना पूर्ण शुल्क भरल्याशिवाय ऑनलाईन वर्गात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे १७६ पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांच्याकडे धाव घेतली. पालकांच्या तक्रारीची दखल घेत चित्रे यांनी शाळेत ठिय्या आंदोलन केले आहे. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा निर्णय प्रशासनाचा असल्याचे सांगत हतबलता व्यक्त केली. अखिल चित्रे यांनी ४८ तासांची मुदत देत विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात प्रवेश न दिल्यास शाळेबाहेर विद्यार्थी व पालकांना घेऊन भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
शिक्षण मंत्र्यांचे आदेशाचे पालन नाही -
नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शैक्षणिक शुल्का अभावी ऑनलाईन वर्ग व शिक्षणापासून कोणत्याही विद्यार्थ्यांना दूर ठेवता येणार नाही अशा संस्थेविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले होते. मात्र, आज या आदेशांचे पालन होताना दिसून येत नाही. अनेक शाळा शैक्षणिक शुल्क भरण्याचे पालकांकडे तगादा लावण्यात येत आहे. शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडत आहे.