मुंबई - गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि गर्दीच गर्दी. पण यंदा गणरायाचे आगमन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे मनसेने यंदा आम्ही आणू 'बाप्पा तुमच्या घरी’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
गर्दी टाळण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यामागचा उद्देश आहे. अनेकांच्या घरी वरिष्ठ नागरिक असतात, तर काहींना वाहन व इतर साधनाअभावी होणारा त्रास पाहता श्री गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माहीम विधानसभेतर्फे आम्ही आणू 'बाप्पा तुमच्या घरी' हा अभिनव उपक्रम हाती घेतला असल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
माहीम, दादर ते प्रभादेवी परिसरात प्रथम हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी मनसे सैनिकांचे संपर्क क्रमांक त्या-त्या विभागात जाहीर करण्यात येणार आहे. राज्यात व मुंबई शहरात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्यशासनानेदेखील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. 4 फुटांपेक्षा मोठी मूर्ती न बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक न काढण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं हाती घेतलेल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.