मुंबई - देशातील पाकिस्तान व बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 9 फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला राज्यभरातून मनसे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने रविवार 9 फेब्रुवारीला घेण्यात येणारा ब्लॉक रद्द करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच जादा लोकल गाड्या उपनगरीय मार्गावर सोडाव्यात, अशीही मागणी मनसे रेल्वे कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
हेही वाचा... कुणाल कामराने इंडिगोला पाठवली नोटीस, ठोकला २५ लाख भरपाईचा दावा
येत्या 9 फेब्रुवारीला होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार आहेत. या मोर्चात मनसे सैनिकांसोबत विविध सामाजिक संघटना, हिंदी मराठी सेलिब्रिटी देखील सहभागी होणार आहेत. या मोर्चाला लाखोंच्या संख्येने मनसे कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत नागरिक रस्त्यावर उतरतील. त्यामुळे रविवारी ब्लॉक घेतल्यास त्यांची गैरसोय होईल. ती टाळण्यासाठी ब्लॉक रद्द करावा अन्यथा तो रात्री घेण्यात यावा, अशी मागणी मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे केल्याचे मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितू पाटील यांनी सांगितले. रेल्वे प्रशासन याबाबत विचार करणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा... 'भारताच्या अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यात अपयशी ठरणारा अर्थसंकल्प'