मुंबई - करोनाच्या युद्धात देवदूत म्हणून आरोग्य सेवा देणाऱ्या बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, यावरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारने आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला, असे म्हणत हे श्रेय मनसेचे असल्याचा दावा केला आहे.
जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या डॉक्टर्सना आम्ही न्याय मिळवून देऊ शकलो, याचा आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया देखील अमित ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयावर व्यक्त केली. बंधपत्रित डॉक्टरांच्या वेतनात यापूर्वी कपात करण्यात आली होती. त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे याकडे लक्ष वेधत ही कपात रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच याबाबत अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट देखील घेतली होती. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे.
डॉक्टर्सला यामुळे प्रोत्साहन मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार तर आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार, इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार, इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल.