मुंबई : आज तीन एप्रिल, अक्षय तृतीया हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण. त्याचबरोबर आज मुस्लिम धर्मीयांचा पवित्र सण ईदही आहे. आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभर महाआरत्यांचे आयोजन केले होते. मात्र, काल अचानक त्यांनी एक पत्र आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट केलं व त्यात मुस्लिम धर्मीयांच्या भावना जपत महाआरत्या न करण्याचं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं. यात त्यांनी एक ओळ अशी लिहिली होती 'पुढची भूमिका काय असेल ते मी उद्या माझ्या ट्विट द्वारे स्पष्ट करेन.'
भूमिका ठरली पण जाहीर नाही : यासंदर्भात आज मनसेच्या प्रमुख नेत्यांची शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत भूमिकादेखील ठरली. मात्र, ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. बैठक संपल्यावर मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती की, पक्षाची जी काही भूमिका ती पुढच्या काहीच मिनिटांत स्वतः राज ठाकरे जाहीर करतील.
त्या दोन महत्त्वाच्या घटना : आपली ही पुढची भूमिका राज ठाकरे साधारण दोन वाजेपर्यंत जाहीर करतील अशी चर्चा होती. मात्र, याच वेळी राज्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यातील एक होती औरंगाबादमध्ये तर, दुसरी होती सांगलीमध्ये. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी सभा घेतली. त्या सभेत कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्या प्रकरणी त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ( FIR Registered Against MNS Chief Raj Thackeray ) आहे. तर, सांगलीत 2008 च्या एका जुन्या प्रकरणावरुन न्यायालयाने राज ठाकरे यांच्या नावाने अटक वॉरंट जारी केला आहे. त्यामुळे या दोन कारणांमुळे राज ठाकरे यांना आपली भूमिका जाहीर करायला वेळ लागतोय का? अशी चर्चा सध्या रंगल्या आहेत.
मनसेचे पदाधिकारी नॉटरिचेबल : तर दुसरीकडे मनसेचे पदाधिकारी देखील नॉट रिचेबल आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे फोन एक तर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर किंवा व्यस्त लागत आहेत. पोलीस महासंचालक यांनी पत्रकार परिषदेत कारवाई करण्याचे आदेश जाहीर केल्यानंतर घाटकोपरमध्ये देखील मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर शिवतीर्थावर कोणतेही पदाधिकारी थांबत नाहीयेत. मनसेचे पदाधिकारी इथे येतात आपली प्रतिक्रिया देतात आणि न थांबता निघून जातात. त्यामुळे कुठेतरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अटकेची भीती आहे का? अशा देखील चर्चा आहेत.