मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या MNS chief Raj Thackeray meet CM Eknath Shinde भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यांनी वर्षातील बाप्पाचे दर्शन घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जावून भेट घेतली होती. त्यानंतर आज राज ठाकरे वर्षावर भेट घेतल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला येथे जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे मुलगा अमित ठाकरे मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हेदेखील उपस्थित होते. सायंकाळी साडेसातच्या दरम्यान राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. बाप्पाचे दर्शन घेऊन केवळ पंधरा ते वीस मिनिटात राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानावरून निघाले.
नेमकी याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांचे स्नेह भोजनाचा कार्यक्रमदेखील ठेवला होता. त्यामुळे सरकारी पक्षातील अनेक आमदार यावेळी तिथे उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी या भेटीदरम्यान केवळ बाप्पाचे दर्शन घेत केवळ औपचारिक गप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केल्या आहेत.