मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येत्या 17 सप्टेंबरपासून ते आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला Raj Thackeray Maharashtra Tour सुरुवात करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. विदर्भापासून राज ठाकरे आपल्या दौऱ्याचा आरंभ करणार आहेत. मोदींच्या वाढदिवशीच राज ठाकरे दौैऱ्यावर जात आहेत. शिवाय राज ठाकरे सहकुटुंब आज मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जावून बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची माहिती आहे.
भाजपसोबत मनसेची जवळीक वाढली - गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते राज ठाकरे आणि भाजपमधील भेटीगाठी आणि जवळीक वाढत आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे 17 सप्टेंबरपासून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे नागपूरमधून करणारा आहेत. सुरुवातीला विदर्भाचा आढावा घेऊन राज ठाकरे यांचा ताफा पुढे सरकेल. मात्र, त्यांच्या दौऱ्याची चर्चा सुरू आहे ती दौऱ्याच्या तारखेमुळे. कारण, याच तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देखील असतो. त्यामुळे भाजपसोबत असलेले संबंध अधिक घट्ट करण्यासाठी राज ठाकरे यांनी ही तारीख निवडल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
मनसे पूर्ण ताकदीने मैदानात - पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यासोबतच शिवसेनेसह महाविकास आघाडीला धक्का देण्याची तयारी राज ठाकरेंनी केली आहे. स्थानिक स्वायत्त संस्थांमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र मनपाच्या आगामी निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र लढणार असल्याचे मानले जात आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली.
मनसेत इनकमिंग - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात एकीकडे त्यांच्या पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बैठक आणि चर्चा होणार आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबतही चर्चा होणार आहे. यासोबतच इतर पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही मनसेत प्रवेश दिला जाणार आहे.
तयारीसाठी पदाधिकारी जाणार पुढे - पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या या दौऱ्यासाठी पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद अंबडवार यांच्यासह मनसेचे ज्येष्ठ पदाधिकारी चार दिवस अगोदर नियोजित ठिकणी येथे पोहोचणार आहेत. तिथे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या प्रस्तावित दौऱ्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली जाणार आहे.