मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला मनसेच्या मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava) भाषण करून पुन्हा एकदा राज्यात खळबळ उडवून दिली आहे. राज ठाकरे यांनी या भाषणादरम्यान महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीकेची झोड उठवत राष्ट्रवादीमुळे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जातीयता पसरत असल्याचा आरोप केला. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित करून पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला जनतेसमोर नव्या मुद्द्यांसह सादर करण्याचा प्रयत्न केला.
मनसेचेी आतापर्यंतची स्थिती - २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाला घवघवीत यश पहिल्याच प्रयत्नात मिळाले आणि १३ आमदार निवडून आले, तर मुंबई महापालिकेत २८ नगरसेवक निवडून आले होते. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची आजची अवस्था विधानसभेत एक आमदार आणि महापालिकेत एक नगरसेवक इतकी सीमित झाली आहे. त्यामुळे राजकीय गणितं आणि समीकरणं जुळवण्यात अपयशी ठरलेल्या राज ठाकरे यांनी आपल्या प्रचाराचा रोष विकासाचा मुद्दा करून पुन्हा एकदा धर्माच्या मुद्द्याकडे येईल याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच भाजपाने आतापर्यंत केलेले सगळे अनुभव आरोप राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केले. त्यामुळे राज ठाकरे हे भाजपची सी टीम आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात जाणकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
राजकीय अपयशातून राज ठाकरे यांचा वैचारिक गोंधळ - गेल्या काही वर्षांमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये सातत्य राहिलेले नाही. राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे हाती घेतले आणि सोडून दिले. राज ठाकरे यांच्या मुद्द्यांमध्ये, भूमिकांमध्ये सातत्य दिसत नाही. त्यांची धरसोड वृत्ती त्यांना यश मिळवून देत नाही. राज ठाकरे एक उत्तम वक्ते आहेत. मात्र, त्यांच्या भूमिका आणि मुद्दे यांना जनतेतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याचं मतांमध्ये रूपांतर होताना दिसत नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी मराठी माणसाचा मुद्दा, स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दा आणि विकासाची ब्लू प्रिंट घेऊन मनसेची सुरुवात केली. मात्र, या मुद्द्यांना यश येताना दिसत नसल्याने पुन्हा एकदा धर्माच्या आधारावर यशस्वी झालेल्या भाजपा चित्र होण्याचा राज ठाकरे हे प्रयत्न करत असल्याने त्यांचा राजकीय गोंधळ उडाला असल्याची प्रतिक्रिया भावसार यांनी व्यक्त केली.
असली आणि नकली यातला फरक कायम राहणार - राज ठाकरे आता हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे वळले आहेत. मात्र, शिवसेनेने सुरुवातीपासून हिंदुत्वाचा मुद्दा अंगीकारला आणि तो कधीही सोडला नाही. प्रसंगी शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दासाठी अनेक गुन्हे अंगावर घेतले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी कितीही हिंदुत्वाच्या मुद्द्याला स्पर्श करीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तरी असली आणि नकली यात फरक असतो आणि तो कायम राहील, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरे हे काहीतरी सकारात्मक आणि विकासात्मक राज्यात काम करतील अशी अपेक्षा जनमानसामध्ये होती. मात्र, राज ठाकरे हे आपल्या कोषातून कधीच बाहेर पडले नाहीत. केवळ उत्तम वकृत्व असून चालत नाही त्याला कर्तुत्वाची आणि दूरदृष्टीची जोड लागते. राज ठाकरे यांच्याकडे या दोन्ही गोष्टी असून, त्यांनी कधीही त्याचा योग्य वापर केला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांना जनाधार मिळू शकला नाही. एकूणच राज ठाकरे यांची राजकीय गोची झाली असून, त्यांना नेमका कोणत्या मुद्द्यांवर महापालिका निवडणुकांसाठी जनतेसमोर जावं हा प्रश्न पडला आहे आणि त्यामुळेच ते धडपडत आहे, असेही त्रिवेदी म्हणाले.