मुंबई - कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तर दुसरीकडे कांजूरच्या जागेचा वाद वाढतच चालला असून तो कधी सुटणार हा प्रश्नच आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपले मेट्रोचे प्रकल्प रखडू नयेत यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने कांजूरच्या जागेवरील सर्व मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी पर्यायी जागा शोधण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) मार्गाच्या कारशेडसाठी गोरेगाव पहाडी येथील जागेची चाचपणी सुरू झाली आहे.
अशात आता मेट्रो 4 (वडाळा-कासारवडवली) च्या कारशेडसाठी आणि मेट्रो 14 (कांजूरमार्ग ते बदलापूर) च्या स्थानकासाठी ही पर्यायी जागा शोधण्यात येत असल्याची माहिती एमएमआरडीएतील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. एमएमआरडीएच्या या पावलामुळे कांजूरच्या जागा सोडून देण्याच्या विचारात एमएमआरडीए आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कांजूर होणार होते 'मेट्रो हब'
पश्चिम द्रुतगती मार्गालगत कांजूरमार्ग येथे कारशेडची जागा आहे. या जागेचा पर्याय मेट्रो 3 साठी सुचवण्यात आला होता. पण तत्कालीन फडणवीस सरकारने आरेला प्रथम प्राधान्य देत तेथेच काम सुरू केले. पण 2018 मध्ये मात्र याच जागेवर मेट्रो 6 चे कारशेड बांधण्याचा निर्णय घेत यासाठी परवानगी देण्यात आली. पुढे मेट्रो 14 चे पहिले, सुरुवातीचे स्थानकही बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही दिवसांपूर्वी मेट्रो 3 चे कारशेड आरेतून कांजूरला याच जागेवर हलवण्यात आले. पुढे मेट्रो 4 च्या कारशेडसाठी ही याच जागेची अंतिम निवड करण्यात आली. एकाच ठिकाणी तीन कारशेड आणि एक मेट्रो स्थानक येणार असल्याने ही जागा मेट्रो हब म्हणून ओळखले जाईल असे म्हटले जाऊ लागले.
वादामुळे एमएमआरडीएला डोकेदुखी -
मेट्रो 3 चे कारशेड कांजूरला हलवल्यानंतर कांजूरच्या जागेचा वाद सुरू झाला. एकीकडे भाजपाचा विरोध, दुसरीकडे केंद्र सरकारची वादात उडी, कांजूरच्या जागेवर मालकी हक्क केंद्राने दाखवला. हे कमी म्हणून खासगी बिल्डरने ही या जागेवर मालकी दाखवली. पुढे वाद न्यायालयात गेला. न्यायालयाने कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आणि एकाचवेळी एमएमआरडीएचे मेट्रो 6, 4 आणि 14 असे तीन महत्वाकांक्षी प्रकल्प रखडले. हा एमएमआरडीएसाठी मोठा धक्का ठरला आहे. प्रकल्प बराच काळ रखडला तर प्रकल्पाला आर्थिक फटका लागेल, डेडलाईन पुढे जाईल ही भीती निर्माण झाली. त्यात अजून ही वाद वाढताच आहे. त्यामुळे एमएमआरडीएची डोकेदुखी वाढली आहे. या डोकेदुखीतून सुटका करण्यासाठी आता एमएमआरडीएने तिन्ही प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
जागा शोधणे आव्हानात्मक -
मेट्रो 6 साठी एमएमआरडीएने गोरेगाव पहाडी च्या जागेची चाचपणी सुरू केली आहे. ही जागा मिळावी यासाठी त्यांनी राज्य सरकारला पत्र ही लिहिले आहे. ही जागा काही खासगी बिल्डरांच्या मालकीची असल्याची माहिती पुढे येत आहे. ही जागा संपादित करण्यासाठी एमएमआरडीएला तांत्रिक आणि आर्थिक अडचणी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे मेट्रो 4 साठी कुठे जागा शोधावी हा मोठा प्रश्न आहे. कारण याआधी जी मोगरपाडा येथील जागा मेट्रो 4 साठी शोधण्यात आली होती त्याला स्थानिकांचा, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या विरोधामुळे एमएमआरडीएने मेट्रो 4 चे कारशेड कांजूरला हलवण्यात आले आहे. पण आता या जागेचा वाद पेटल्याने मेट्रो 4 साठी ही नवीन जागा शोधावी लागणार आहे. तर मोगरपाडा जागेचा पुन्हा पर्याय आणला तर विरोध दूर करण्याचे मोठे आव्हान एमएमआरडीए समोर असणार आहेत. तर मेट्रो 14 चे पहिले स्थानकच कांजूर येथून सुरू होणार असल्याने यासाठी आसपासच्या जागेचा शोध घेणे हे महत्वाचे ठरणार आहे. तेव्हा हे आव्हान एमएमआरडीए कसे पेलणार हे पाहणे आता विशेष महत्वाचे आहे.