मुंबई - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने तब्बल 8 हजार 888 तिवरांच्या झाडांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो-3 प्रकल्पादरम्यान बीकेसी आणि धारावीत काही तिवरांच्या झाडांची कत्तर करावी लागली होती. त्याबदल्यात आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून तब्बल 8 हजार 888 झाडे लावण्यात येणार आहेत.
मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामासाठी 108 झाडांची कत्तल
मेट्रो 3 प्रकल्पातील बीकेसी आणि धारावी मेट्रो स्थानकाच्या कामासाठी 108 तिवरांची कत्तल करण्यात आली होती. तर नियमानुसार एखाद्या प्रकल्पासाठी जितके झाडे कापली जातील, त्याच्या तीनपट झाडे लावावी लागतात. त्यानुसार या 108 तिवरांच्या मोबदल्यात एमएमआरसीने 8 हजार 888 तिवरांच्या झाडांची लागवड करण्याच्या निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील कांदळवनात या तिवरांच्या रोपांची टप्याटप्याने लागवड केली जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात 'एमएमआरसी'चे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या हस्ते काही रोपे लावून करण्यात आली.
3 वर्षानंतर जाग, पर्यावरण प्रेमींची टीका
बीकेसी आणि धारावी येथील 108 तिवरांची कत्तल 2017 मध्ये करण्यात आली होती. तर आता तीन वर्षानंतर 'एमएमआरसी'ने ही झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'एमएमआरसी'ला तीन वर्षानंतर जाग आली का असा सवाल पर्यावरण प्रेमी उपस्थित करत आहेत.