मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पातील 35 वा ब्रेकथ्रू आज यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. सिद्धिविनायक ते दादर हा १.१२ किमीचे भुयारीकरण या 35 व्या ब्रेकथ्रू माध्यमातून पूर्ण झाले आहे. तर या भुयारीकरणासह पॅकेज-४चे एकूण १०.९६ किमी लांबीचे भुयारीकरण आज पूर्ण झाले आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (एमएमआरसी) 32.50 किमीचा मेट्रो 3 मार्ग बांधण्यात येत आहे. मुंबईच्या पोटात टीबीएम मशीन सोडत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भुयारीकरण करण्यात येत आहे. या टीबीएम मशीन भुयारीकरण पूर्ण करत बाहेर येतात तेव्हा त्याला ब्रेकथ्रू म्हणतात. त्यानुसार आतापर्यंत 34 वे ब्रेकथ्रू पूर्ण झाले आहेत. तर आज 35 वा ब्रेकथ्रू पूर्ण करत कृष्णा 1 टीबीएम मशीन बाहेर पडले आहे. हेरेन्कटनेट कंपनीद्वारे बनलेले व अर्थ प्रेशर बॅलेन्स (ई.पी.बी) तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) कृष्णा-१ द्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले. जुलै 2020 मध्ये या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली होती.
दादर मेट्रो स्थानकाचे 42 टक्के काम पूर्ण
आज जो 35 वा ब्रेकथ्रू पूर्ण झाला तो सिद्धिविनायक ते दादर असा होता. तर हा ब्रेकथ्रू पॅकेज 4 मधील असून आता 7 पॅकेजपैकी 4 पॅकेजमधील भुयारीकरण 100 टक्के पूर्ण झाले आहे. तर त्याचवेळी दादर रेल्वे स्थानकाचे काम 42 टक्के पूर्ण झाल्याची माहिती रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक, एमएमआरसी यांनी दिली आहे.