मुंबई - मुंबई पालिकेने (BMC) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane Juhu Bungalow) यांच्या जुहूमधील आधिश इमारतीमध्ये बांधकाम अनियमित असल्याची नोटीस राणे कुटुंबियांना पाठवली होती. मात्र, याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नारायण राणे यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे सत्याचा विजय असल्याचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) म्हणाले. मुंबई पालिकेला केवळ नारायण राणे, किरीट सोमैया आणि मोहित कंबोज यांच्याबाबतच अनियमितता दिसते. मुंबईत इतर सर्व आलबेल सुरू आहे का? असा टोलाही नितेश राणे यांनी महानगरपालिका आणि शिवसेनेला लगावला आहे.
आयुक्तांना कोणत्या शिवसेना नेत्याचे फोन?
राणे कुटुंबियांच्या घरांवर कारवाई व्हावी यासाठी शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना वारंवार फोन केले जात होते. महापालिकेने ज्यावेळेस ही नोटीस काढली, त्यावेळचे पालिका आयुक्तांचे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजे. त्यामुळे या वेळेत पालिका आयुक्तांना कोणते शिवसेना नेते कॉल करत होते हे समोर येईल, असे नितेश राणे यावेळी म्हणाले.
आम्ही कलम 353 चे लाभार्थी-
आम्ही आमदार असून, दोन ते तीन लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो. जनतेचे प्रश्न घेऊन अधिकाऱ्यांसमोर जात असतो. मात्र, कलम 353 चा गैरवापर करून अधिकारी अनेकवेळा जनतेच्या प्रतिनिधींना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कलम 353 चे आम्ही लाभार्थी आहोत, अशी कोपरखळी नितेश राणे यांनी राज्य सरकारला लगावला. तसेच कलम 353 बाबत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून यावर निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संजय राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही-
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्य सरकारने घेण्यास घाई केली, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊत हे जनतेतून निवडून आलेले प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे आपण त्यांना कधीही गांभीर्याने घेत नाही. तसेच इतर कोणीही त्यांना गांभीर्याने घेऊ नये, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
परिवहन मंत्र्यांना एसटी कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही-
गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, परिवहन मंत्र्यांना एसटी कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. इतर आर्थिक व्यवहार करण्यात ते मश्गुल आहेत. आर्थिक व्यवहारातून जमा केलेले पैसे आपल्या मालकाकडे पोहचवणे त्यांना जास्त महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास मालक त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारेल, असा टोमणा नितेश राणे यांनी एसटीच्या मुद्द्यावरून परिवहन मंत्री अनिल परब यांना लगावला आहे.