मुंबई - मुलुंडमध्ये रिचर्ड सन्स अँड क्रूडास या कंपनीच्या आवारात सिडकोने तयार केलेल्या 1650 बेडच्या कोविड सेंटर त्वरित चालू करावे, अशी मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या सेंटरचे लोकार्पण तर झाले पण सुरू कधी होणार, असा प्रश्न कोटेचा यांनी उपस्थित केला आहे. या सेंटरमध्ये आयसीयू, डायलेसिस सेंटर तयार करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या सेंटरमध्ये 215 आयसीयू बेड आणि 75 डायलेसिस बेड यांची उपाययोजना करण्यात आली होती. परंतु कंत्राटदारांनी या सुविधा उपलब्ध केल्या नाहीत याकडे कोटेचा यांनी लक्ष वेधले आहे. पूर्व उपनगरात दिवसेदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही हे सेंटर सुरू झालेले नाही. 3 जुलै रोजी याचे लोकार्पणही झाले. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येथील सेवा-सुविधांची पाहणी करण्याकरीता मंगळवारी या सेंटरला भेट दिली. तेथील व्यवस्था पाहून मला धक्का बसला, असे कोटेचा यांनी सांगितले.
लोकार्पण झाल्यानंतर कोणतीही वैद्यकीय टीम अद्यापही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे एक रुग्णही तेथे उपचाराकरीता भरती झालेला नाही. तसेच या रुग्णालयामध्ये सिडकोने दिलेल्या निर्देशानुसार या सेंटरमध्ये 1560 आयसोलेशन बेड 215 आयसीयू बेड, 75 डायलेसियस बेडची व्यवस्था 8 जूनपर्यंत पूर्ण करायची होती. एक महिना पूर्ण झाला आहे. परंतु आयसीयू व डायलेसियस बेड कोणतीही व्यवस्था झालेली नाही.
आज अनेक रुग्णांना शासनाकडून वेळेवर उपचार मिळत नाहीत. नाईलाजाने खासगी महागड्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे मागणी केली आहे की, सेंटरचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर त्वरीत कारवाई करावी. आयसीयू व डायलेसिस बेड त्वरीत उपलब्ध करून द्यावे, तसेच कोविड सेंटरकरीता तातडीने वैद्यकीय टीम पाठवावी, असे कोटेचा यांनी सांगितले.