मुंबई - निवडणुकीच्या काळामध्ये आकडे फेकून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपासाठी नवीन नाही. राज्यातील आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात भाजपाने अशाच प्रकारे दिशाभूल केली होती. परंतु राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक जनतेने महाविकास आघाडीलाच पसंती दिली असल्याची प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
'महाविकास आघाडीला पसंती'
मलिक म्हणाले, की राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निकालांमध्ये महाविकास आघाडीच्या समर्थक असलेल्या 80 टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीचा निकाल हा महाविकास आघाडीच्या समर्थकांच्या बाजूने मिळालेले आहेत तर यातूनच राज्यातील जनतेची पसंती कळली आहे. मात्र या निवडणुका कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. तरीसुद्धा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता आणि काही आकडे फेकून दिशाभूल केली होती, असा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.
'गटबाजी सोडून गावाच्या विकासासाठी एकत्र यावे'
निवडणूक निकालानंतर आज गावागावांमध्ये तणाव आणि गटबाजी केली जाऊ नये, आता ग्रामपंचायतीचा निकाल आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी हे गटबाजी सोडून गावाच्या विकासासाठी एकत्र यावे, आणि तसे काम करावे. इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनंतर जन्मभर वैर असते, तशी परिस्थिती आपल्या राज्यात येऊ देऊ नये, असे आवाहनही मलिक यांनी राज्यातील जनतेला केले.