मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने राजकीय वर्तुळातही भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या लाटेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा यात समावेश आहे. तर काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले होते.
एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोना-
कोल्हापूरचे पालक मंत्री सतेज पाटील यांनीही कोरोनाची लागण झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना कोरोना झाल्याने ते स्वतः विलगीकरणात आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला असून खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व मंत्र्यांनी अनेक लोकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी काळजी घ्यावी, तसेच गरज पडल्यास लवकरात लवकर कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन या नेते मंडळींनी केली आहेत.
अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्याचे आदेश-
मुंबईमध्ये मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला होता. यामुळे सर्व व्यवहार टप्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. मुंबईची लोकल ट्रेनही १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु झाली आहे. मात्र, कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये तर लॉकडाऊन करण्यापर्यंत परिस्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊनची जबाबदारी, कोरोना संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये कंटेन्मेंट झोन तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच राज्यभरात प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
सुरवातीच्या कोरोना लाटेचा फटका बसलेले नेतेमंडळी-
उपमुख्यमंत्री अजित पवार-
गेल्या ऑक्टोबर महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील कोरोनाने गाठले होते. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर मात केली होती.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे-
जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट झालं होतं.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण-
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सुद्धा कोरोनाने बाधित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना नांदेडहून एका विशेष अँब्युलन्सने उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं होतं.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड-
सर्वांत आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोरोनाबाधित झाले होते. त्यांच्यावर मुंबईतल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार झाल्यावर ते पूर्णपणे बरे झाले.
तर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत बालके यांचा कोरोनाने मृत्य झाला होता.
वाढत्या कोरोनाचा अधिवेशनात पुन्हा बसणार फटका?
अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्च पासून सुरू होत आहे. साधारणत: चार आठवडे अर्थसंकल्पीय अधिवेशन असते. मात्र गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा फैलाव सुरू झाला. त्यामुळे त्यापुढील दोन्ही अधिवेशन दोन ते तीन दिवसांत उरकावे लागले होते. मात्र जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी दिवस ठेवण्यात येणार आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सध्या कोरोनाचा वाढत प्रसार पाहता अर्थसंकल्पीय अधिवेशनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आजपर्यंतचे रुग्ण-
२,५४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण १९,८७,८०४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५% एवढे झाले आहे. राज्यात आज ३८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.४८ % एवढा आहे. मात्र, जनतेने योग्य खबरदारी घेऊन अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना केल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाने याबाबत सतर्क राहावे असे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहे.
हेही वाचा- मद्रास उच्च न्यायालयाची 'सीरम' आणि आईसीएमआरला नोटीस