मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात स्वतःहून उपस्थित राहिले. त्याआधी त्यांनी सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला. अनिल देशमुख यांना छगन भुजबळ यांच्यासारखे फसवण्यात आले आहे. ज्यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लावले ते फरार आहेत. ज्यांच्यावर आरोप आहेत ती व्यक्ती स्वतःहून चौकशीला गेली तर तिला अटक करण्यात आले. ही कारवाई राजकीय सुडातून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरविण्यासाठी केली गेली आहे, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.
हेही वाचा - विलेपार्ले येथे एनसीबीकडून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, संशयित आरोपी फरार
विरोधकांकडून सत्तेचा दुरुपयोग
काल भाजपच्या नेत्यांनी ट्विट केले की, पुढचा नंबर अनिल परब यांचा आहे. याचा अर्थ सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. अनिल देशमुख यांना अटक केली असली तरी, कायदा आपले काम करेल. एक ना एक दिवस सत्य लोकांसमोर येईलच, मात्र परमबीर सिंग कुठे आहेत? याचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.
परमबीर सिंग हे महाराष्ट्रातून चंदीगढ येथे गेले. त्यानंतर ते परतले नाहीत. काही लोक सांगतात ते परदेशात गेले आहेत. लुकआऊट नोटीस असतानाही कोणताही व्यक्ती देश सोडून कसा जाऊ शकतो? एकतर हवाई मार्गे किंवा रस्ते मार्गाने जावे लागेल. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यांतून नेपाळला जाता येते. या तीनही राज्यात भाजपचे सरकार आहे. इतर लोकांप्रमाणे परमबीर सिंह यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली आहे का? ते कसे पळून गेले याचे उत्तर भाजपने द्यावे, असेही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा - मुंबई महापालिकेकडून सुमुद्रकिनारी छट पूजेला बंदी, 'असे' आहेत नियम