मुंबई - सर्वपक्षीय आमदारांना मुंबईमधील गोरेगाव येथे तीनशे घर उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा काल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. आमदारांना मोफत घरे दिली जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात उमटू लागल्यानंतर निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत म्हटलं आहे की, मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या एकाही आमदारांना या योजनेतील घरे मिळणार नाहीत. केवळ ग्रामीण भागात राहणाऱ्या आमदारांसाठी या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच आमदारांना घर घेण्यासाठी जवळपास 75 लाख ते 1 कोटी रुपये पर्यंत किंमत मोजावी लागेल असे जितेंद्र आव्हाड यांनी आज विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
आमदारांची मागणी - कोणत्याही आमदारांना फुकटात घर मिळणार नाहीत. ग्रामीण भागातून अनेक आमदार मुंबईत येत असतात. अशावेळी त्या आमदारांना अडचण होऊ नये यासाठी हे घर बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या आधीच्या सरकारने देखील आमदारांना घर उपलब्ध करून दिली होती. तसेच महा विकास आघाडी सरकारने मुंबईच्या सर्व स्तरांतील लोकांना घरं उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे आमदारांनाही घरं मिळावीत अशी अनेक आमदारांची इच्छा होती. त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
भाजपाच्या आमदारांनी घरं नको असं स्पष्ट करावं - आमदारांना घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर यावर विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सोडून टीका केली. राज्य सरकारने घेतलेला निर्णय अगदी चुकीचा असून, राज्यातील आणि मुंबईतील सर्वसामान्य जनतेला आधी राज्य सरकारने घर उपलब्ध करून द्यावीत असे विरोधी आमदारांकडून मागणी करण्यात आली आहे. पण ही घरे सर्वपक्षीय आमदारांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच या योजनेअंतर्गत घरे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना नको असल्यास त्यांनी याबाबत स्पष्ट सांगावे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षाला केले आहे.
कालिदास कोळंबकर काय म्हणतात याच्याशी घेणेदेणे नाही - नायगाव येथील डीडी चाळीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली आहे. मात्र बीडीडी चाळींचा पुनर्विकास नंतर त्यांना कोणतं नाव देण्यात यावं याचा पूर्ण अधिकार कॅबिनेट चा तसेच म्हाडाचा आहे. त्यामुळे स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर हे काय म्हणतात याच्याशी आपल्याला काहीही देणंघेणं नसल्याचं तुम्हाला जितेंद्र आव्हाड यांनी कोळकर यांना लगावला.
महादेव जानकरांकडून स्वागत - आमदारांसाठी मुंबई घरे बांधण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. या निर्णयावर भारतीय जनता पक्षाकडून राज्य सरकारवर कडाडून टीका केली जात असली तरी, भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या आमदारांकडे अनेक वेळा मुंबईत आपले स्वतःचे घर नसते, त्यामुळे त्या आमदारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. स्वतः आपलंही मुंबईत कोणताही घर नाही. त्यामुळे अनेक वेळा मतदारसंघातून किंवा ग्रामीण भागातून येणाऱ्या आपल्या कार्यकर्ते किंवा मतदारांना मदत करण्याची इच्छा अपेक्षा असताना देखील मदत करता येत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मुंबईत आमदारांना घर बांधण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याचे आपण स्वागत करत असल्यास महादेव जानकर यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.