मुंबई - महसूल मंत्री जयंत पाटील यांची ब्रीच कँडी रुग्णालयात अँजिओग्राफी चाचणी झाली असून त्यात कोणताही दोष आढळलेला नाही. मात्र दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. काल (28 जुलै) राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. तत्काळ ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र आज त्यांनी आपल्यावर अँजिओग्राफी होऊन आपली प्रकृती चांगली असल्याची माहिती ट्विटव्दारे दिली आहे.
हॉस्पिटलमधून जनतेला आवाहन
सांगली येथे कृष्णा नदीचा पूर ओसरून पाणी पातळी ४० फुट इतकी सुरक्षित झाली आहे. ती आणखी कमी होत आहे. सध्या कोयना धरणात पाणी साठा ९० टीएमसी असून (८७%) धरणातून ३०००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज असून धरणातून पाणी विसर्ग थोडासा वाढवून पाणी साठा कमी केल्यास मोठ्या पावसाच्या कालावधीत विसर्ग नियंत्रित ठेवता येईल. त्यामुळे कोयना धरणातून सद्याचा ३०००० विसर्ग थोडासा वाढवून ५०००० क्यूसेक्स करण्याचे नियोजन आहे. तसेच सांगली येथे कृष्णाची पातळी काही प्रमाणात वाढेल, परंतु घाबरण्याचे कारण नाही. मोठा पाऊस जर आला तर तो धरणांतच अडवण आवश्यक आहे. नागरीकानी काळजी करू नये, असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.