मुंबई - महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने आम्ही महाज्योती संस्था स्थापन करत आहोत. त्याचे मुख्य कार्यालय पुण्यात तर विभागीय कार्यालये ही नागपूर आणि बुलडाण्यात असतील, अशी माहिती राज्याचे विमुक्त जाती, भटक्या जमाती व ओबीसी कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिली.
महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून ओबोसी, एसबीसी आणि व्हीजेएनटी या समाजाला त्याचे लाभ मिळणार आहेत. महाज्योती ही संस्था बार्टी आणि सारथी या संस्थांच्या धर्तीवर असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे, असे ते म्हणाले.
धनगर समाजाच्या मागण्या आणि आशा, आकांशा पूर्ण करण्यासाठी आदिवासींच्या सर्व योजना देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून त्याचे काम सुरू झाले आहे. तसेच अनेक योजनांवर आम्ही काम सुरू केले असून त्यातील १३ योजना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्या आहेत. या योजनेसाठी आम्ही १५ ऑगस्टपर्यंत जीआर काढू, तसेच त्याचे लेखाशीर्ष काढले जाईल, असे त्यांनी सांगितले.
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृह स्थापन केले जाणार आहेत, तोपर्यंत या विद्यार्थ्यांना आम्ही पैसे देऊन मेंढपाळांना चराईसाठी वेगळा निधी देणार आहोत. तसेच धनगर समाजाला १० हजार घरकुल देणार आहोत, त्यासाठी मोठा निधी आम्ही राखून ठेवला आहे. नामांकित शाळेत धनगर समाजाची जी मुले शिकतील त्यांचे शुल्क दिले जाणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही समाजाच्या विकासाला एक वेगळा मार्ग मिळेल. या कामात आम्हाला खासदार विकास महात्मे यांचे मार्गदर्शन लाभले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महादेव जानकरांची प्रतिक्रिया
आज ज्या १३ योजना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्या आहेत, त्यावर प्रतिक्रिया देताना जानकर यांनी आजचा दिवस हा सुवर्ण दिवस आहे, असे म्हटले. तसेच सरकारने प्रतिज्ञापत्र दिले आहे, मात्र, त्याला वेळ लागणार असल्याने तोपर्यंत हा निधी दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.