मुंबई - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी रात्री मलबार हिल पोलीस स्टेशनमधे महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल (Dhananjay Munde Extortion Complaint against Woman) केला आहे. ही महिला धनंजय मुंडे यांच्या परिचित असल्याची देखील माहिती मिळत आहे. या महिलेने फोनच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल करु, अशी धमकी दिली. धनंजय मुंडे यांना मिळालेल्या या धमकीनंतर त्यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पाच कोटींची मागितली खंडणी - या महिलेने आंतरराष्ट्रीय फोनवरून धनंजय मुंडे यांना फोन केला. या फोनवरून महिलेने धनंजय मुंडे यांना पाच कोटी रुपयांची मागणी तसेच महागड्या फोनची मागणी केली. आपली मागणी पूर्ण न केल्यास धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करू तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांची बदनामीही करू, अशी धमकी या महिलेने फोनवरून दिली.
गुन्हे शाखेकडून तपास सुरू - धनंजय मुंडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, आधीपासूनच करुणा शर्मा यांच्यामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे यांना धमकी देणारी आता ही दुसरी महिला कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.