मुंबई राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने येत आहेत. विधानभवनात एकमेकांविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे हा वाद शिगेला पोहोचला आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेची सर्वच बाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता शिवाजीपार्कवरील दसरा मेळावा हायजॅक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेने महापालिका प्रशासनाकडे मेळाव्यासाठी परवानगी मागितली असताना अद्याप दिलेली नाही. त्यामुळे शिंदे गट शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. या सर्व प्रकरणावर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली the Dussehra gathering has not been decided yet आहे.
केसरकर म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे यांनी हे सरकार स्थापन केले आहे. बाळासाहेबांच्या विचारपासून कधीच फारकत घेतली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी हा दसरा मेळावा सुरु केला आहे. हा दसरा मेळावा घ्यायचा की नाही याबाबत अजून तरी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला नाही. ठाकरे गटाने परवानगी मागावी. मात्र, या संदर्भात काही परवानगी पाहिजे असेल तर ते देतील. या सर्व प्रकरणामध्ये मुख्यमंत्री योग्य निर्णय देतील, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांचा वाद आता घटनापीठाकडे गेला आहे. हे आता अजून 4-5 वर्ष चालेल. यादरम्यान दुसरी निवडणुक जिंकून पुन्हा सत्तेत येऊ, असे विधान भरत गोगावले यांनी केले होते. यावरुन विरोधकांनी भरत गोगावले यांच्यावर टीकास्त्र डागले होते. यावर दीपक केसरकर यांनी गोगावले यांची पाठराखण करताना, जाहीर सभेमध्ये नेते भरत गोगावले यांनी सुप्रीम कोर्टाबद्दल विधान केले. मात्र, यामध्ये मुख्यमंत्री यांचा संबंध नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोणतेही मत व्यक्त करणे योग्य नाही. यानंतर कोणी यासंदर्भात बोलणार नाही, याची काळजी घेऊ अशी सारवासारव केली. तसेच शिंदे गटाकडून पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलण्यात आला आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील शिवसेना भवना ऐवजी ठाण्यातील आनंद आश्रम हा पत्ता दिला असला तरी एकनाथ शिंदे गटाचे कार्यालय मुंबईमध्येच असेल, असा दावा केला.